Latest

पुणे: पीएमपीला 188 कोटींची संचलन तूट; पण ती पुरेल का ?

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पीएमपीला एकवेळची संचलन तूट 188 कोटी देण्याचे मान्य करण्यात आले आहे. मात्र, ही एकवेळची तूट पीएमपीला पुरणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पीएमआरडीए क्षेत्रात बससेवा पुरविण्याच्या बदल्यात संचलन तूट मिळावी, अशी पीएमपीची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार एकवेळची संचलन तूट आता पीएमपीला मिळणार आहे. मात्र, बससेवा ही कायमच पुरविली जाणार आहे. एकवेळ संचलन तूट देऊन पीएमपीची गाडी कशी चालणार? बस सेवेच्या बदल्यात दरवर्षी पीएमआरडीएने संचलन तूट द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मुंबई येथे झालेल्या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनासाठी पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार उपस्थित होत्या.

पीएमआरडीए भागात पीएमपीची 24 टक्के सेवा

– पीएमआरडीए भागातील मार्ग – 113

– मार्गावर धावणाऱ्या रोजच्या बस – 490

– रोजच्या एकूण फेर्‍या – 4 हजार 918

– रोजची प्रवासीसंख्या – 2 लाख 53 हजार 506

– रोजचे उत्पन्न – सुमारे 35 लाख 67 हजार 315

पीएमआरडीए भागात या ठिकाणी जागा हवी

अ. क्र. – रस्त्याचे नाव – आवश्यक क्षेत्र (एकर) – परिसराचे नाव

1) पुणे-सोलापूर रोड – 05 – यवत/चौफुला

2) पुणे-नगर रोड – 05 – शिक्रापूर

3) पुणे-नाशिक रोड – 05 – राजगुरुनगर

4) पुणे-पानशेत रोड – 05 – डोणजे/खानापूर

5) पुणे-सातारा रोड – 05 – कापूरव्होळ/खानापूर

6) पुणे-सासवड रोड – 05 – सासवड ते जेजुरी दरम्यान

7) पुणे-मुंबई रोड जुना हायवे – 05 – वडगाव मावळ

8) हिंजवडी रोड – 05 – कासारसाई

9) पुणे-पौड रोड – 05 – पिरंगुट अथवा जवळच्या परिसरात

मुंबईत नुकतीच बैठक झाली. या वेळी पीएमपीला पीएमआरडीएकडून एकवेळचे 188 कोटी रुपये संचलन तूट म्हणून देण्याचे मान्य झाले आहे. तसेच, पीएमआरडीए भागात बसथांबे आणि डेपोंसाठीसुध्दा जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.

– प्रज्ञा पोतदार, सहव्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT