Latest

पुणे : महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या 18 दिवसांत रद्द

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या 36 आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या अठरा दिवसांपूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणुकीचे कारण देऊन या निरीक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, शहरातील आमदार आणि माजी नगरसेवकांच्या दबावामुळे
आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कार्यालयांतर्गत विविध क्षेत्रिय कार्यालयांकडे आरोग्य निरीक्षक कार्यान्वीत आहेत. यापैकी 36 आरोग्य निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी 18 नोव्हेंबर रोजी काढले होते. मात्र, या आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या 6 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आल्या.

दरम्यान, प्रभाग रचनेमध्ये मतदार याद्यांची फोड करण्यामध्ये आरोग्य निरीक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. नवीन आरोग्य निरीक्षक आल्यानंतर आपल्या मनासारखाचे काम होणार नाही. त्यामुळे या बदल्या रद्द करण्यासाठी शहरातील आमदार, पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी प्रशासनावर दबाव आणला. या दबावाला बळी पडून प्रशासनाने बदल्या रद्द केल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.

आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर बहुतांश निरीक्षक बदली झालेल्या ठिकाणी रुजूच झाले नाहीत. जे रुजू झाले ते कामावर येत नव्हते. या निरीक्षकांची निवडणुकीसाठी बदली स्थगित केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या काहीच हालचाली सुरू नाहीत. मग निवडणूक कारण सांगून बदल्या रद्द करण्यामागचे कारण काय आहे ? बदल्या रद्द करायच्या होत्या तर मग 18 दिवस प्रशासनाने नागरिकांची गैरसोय का केली ? याचे उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
                                                                – नितीन कदम,
                                                          शहराध्यक्ष, राष्ट्रवादी अर्बन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT