Latest

नगरच्या 21 शाळा होणार हायटेक ! ‘पीएम-श्री’ योजनेतून प्रत्येकी 1.88 कोटी रूपयांचा निधी

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : अनुभवात्मक, समग्र, एकात्मिक, खेळाधारित, चिकित्सक, शोध आधारित, विद्यार्थी केंद्रित, चर्चा आधारित, लवचिक आणि आनंददायी शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना अनुभवात्मक पद्धतीने शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यासाठी पीएम-श्री या योजनेतून पहिल्या टप्प्यात नगरच्या 21 शाळांची राज्य स्तरावरून निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दै.पुढारीशी बोलताना दिली. या 21 शाळा लवकरच सर्व बाबतीत हायटेक होऊन कात टाकणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी शाळेला 'अच्छे दिन' येणार असल्याचे मानले जात आहे.

या संदर्भात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पीएम-श्री योजनेत सहभागासाठी राज्याने केंद्र शासनाशी सामंजस्य करार केलेला आहे. त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 राज्यात संपूर्णपणे लागू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 516 शाळांची निवड झाली असून, यात नगर जिल्ह्यातील 21 शाळांचा राज्य स्तरावरून समावेश केला आहे.

पटसंख्या व अन्य अटींची पूर्तता या निकषांवर ही निवड झाली आहे. या प्रत्येक शाळेच्या विकासासाठी 1.88 कोटी किंवा गरजेनुसार निधीची तरतूद असणार आहे. जिल्हा परिषद समग्र शिक्षण विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल वाळके हे सर्व शाळांच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणार आहेत.

शाळांमध्ये होणार महत्त्वाची कामे
या शाळा उत्कृष्ट भौतिक-पायाभूत सुविधांसह, योग्य संसाधनांसह, तसेच आनंददायी व उत्साहवर्धक वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणार्‍या सर्वसमावेशक उत्कृष्ट म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. यात स्वच्छतागृह, संरक्षक भिंत, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, डायनिंग हॉल विथ किचन यासह मुलांचा 21 व्या शतकातील प्रमुख कौशल्यांवर आधारित सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने याद्वारे प्रयत्न केला जात आहे.

जिल्हास्तरीय समितीची स्थापना
योजनेच्या अंमलबजावणीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे अध्यक्ष, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, डाएटचे प्राचार्य भगवान खार्के, तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, नवोदय विद्यालयाचे प्रतिनिधी हे सदस्य असतील. तसेच शिक्षणाधिकारी पाटील हेच सदस्य सचिव असतील.

जिल्ह्यातील या 21 शाळांची निवड
देवीभोयरे, टाकळीमानूर, शिंगवे, राहाता ऊर्दू, ब्राह्मणी, सारोळेपठार, गोंडेगाव, श्रीरामपूर स्कूल नं 7, श्रीगोंदा बॉईज शाळा, पिसोरेखांड, सुलतानपूर बुद्रुक, पाथर्डी बॉईज शाळा, नेवासा ऊर्दू, देवळाली प्रवरा नगरपरिषद शाळा, भेंडा फॅक्टरी, बुर्‍हाणनगर, निंबळक, रवंदे, गणोरे, हाळगाव, शिवाजीनगर केडगाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT