Pm Narendra Modi 
Latest

PM Narendra Modi : भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदी देणार विजयाचा मंत्र

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीपूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांना सज्ज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून (१७ फेब्रुवारी) दिल्लीत सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ३७० जागा तर एनडीएच्या ४०० जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देणार आहेत. रविवारी (१८ फेब्रुवारी) अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

प्रगतीमैदान भागातील भारत मंडपम मध्ये होणाऱ्या अधिवेशनासाठी सर्व राष्ट्रीय आणि राज्यांमधील पदाधिकारी दिल्लीत पोहोचले आहे. लोकसभा निवडणुकीची केव्हाही घोषणा होऊ शकते. भाजपने या निवडणुकीसाठी ३७० जागांचे तर एनडीए आघाडीसाठी ४०० जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठरविले आहे. त्यापार्श्वभूमीवर या अधिवेशनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात येणार आहे. निवडणूकीच्या तोंडावर होणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून यानिमित्ताने संघटनात्मक शक्तीप्रदर्शन करण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा पदाधिकाऱ्यांना विजयाचा मंत्र देणार आहेत.

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. निवडणुकीत उतरण्यापूर्वी पक्ष कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे सर्व लहान-मोठ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. अधिवेशनाची सुरुवात पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाषणाने होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनाने अधिवेशनाचा समारोप होईल.

निर्धारित वेळेत प्रत्येक बूथपर्यंत ताकद पोहोचविण्याचे उद्दीष्ट भाजपने ठरविले असून मतदारांना साद घालण्यासाठी कोणते मुद्दे हाती घ्यावे याचा आराखडा पक्षनेतृत्वाने तयार केला आहे. हा आराखडा अधिवेशनात मांडला जाणार असल्याचे समजते. राम मंदिर उभारणी आणि भाजप सरकारच्या गेल्या दहा वर्षातील लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त प्रचार करण्याची आखणी पक्षाने केली आहे. यासोबतच, संलग्न संघटनांना देखील जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

अधिवेशनासाठी यांना आहे निमंत्रण

राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य, राष्ट्रीय परिषदेचे सदस्य, खासदार (राज्यसभा व लोकसभा), आमदार, विधान परिषद सदस्य, माजी खासदार, मोर्चाचे राष्ट्रीय पदाधिकारी, राज्याचे अधिकारी, कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित राहतील. यासोबतच, शिस्तपालन समिती, वित्त समिती, निवडणूक समिती, माजी प्रदेशाध्यक्ष, लोकसभा क्लस्टर प्रभारी, लोकसभा प्रभारी आणि लोकसभा संयोजक, लोकसभा विस्तारक, राष्ट्रीय प्रवक्ता, राज्य मुख्य प्रवक्ता, राज्य माध्यम संयोजक, राज्य सोशल मीडिया- आयटी सेल संयोजक, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि सरचिटणीस, सेलचे राज्य निमंत्रक, सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महामंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT