नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या नवीन संसद भवन इमारतीचे उद्घाटन रविवारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इमारतीचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. लोकांनी 'माझी संसद, माझा अभिमान' या हॅशटॅगने हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर एकमेकांना पाठवावा, अशी विशेष विनंतीही मोदी यांनी केली आहे.
'नवीन संसद भवन प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आपण जो व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यात या इमारतीची झलक दिसते. प्रत्येकाने आपला 'व्हाईस ओव्हर' वापरुन हा व्हिडिओ शेअर करावा', असे मोदी यांनी म्हटले आहे. पारंपरिकता आणि आधुनिकता याचा संगम नवीन संसद भवन इमारतीत दिसून येत असल्याचे नवीन संसद भवनाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसून येते. देशाचा इतिहास आणि संस्कृती याची झलकही यात दिसून येते, अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी हा व्हिडिओ पाहून दिली आहे.