हरियाणातील महेंद्रगढ लोकसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी द्यावी, यावरून भाजपमध्ये 1999 मध्ये विचारमंथन सुरू होते. त्यावेळी नुकतेच कारगिलचे युद्ध संपले होते. या युद्धात डेप्युटी कमांडंट सुखबीर यादव शहीद झाले होते. त्यांची पत्नी सुधा यादव यांच्यासाठी तो फार मोठा धक्का होता. त्यावेळी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाचे भाजप प्रभारी होते. त्यांनी सुधा यादव यांना उमेदवारी देण्याचे ठरविले.
खुद्द सुधा त्यासाठी तयार नव्हत्या. पतीच्या निधनामुळे त्या सैरभैर झाल्या होत्या. त्यांनी शिक्षकी पेशात स्वतःला गुंतवून घेण्याचे जवळपास पक्के केले होते. त्याचवेळी मोदी यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि तुम्ही निवडणूक लढविणे कसे गरजेचे आहे, हे पटवून दिले. मोदी यांच्याशी बोलणे झाल्यावर लगेचच त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. मोदी यांच्या प्रत्येक शब्दाने त्यांना विलक्षण प्रभावित केले होते. यानंतर त्यांनी महेंद्रगढ मतदार संघातून दणदणीत फरकाने विजय मिळवला. हे सगळे त्यांच्यासाठी स्वप्नवत होते. अर्थातच, या विजयानंतर मोदी यांना धन्यवाद द्यायला त्या विसरल्या नाहीत.