नंदूरबार; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत यावे. त्यांची स्वप्ने निश्चित पूर्ण होतील, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उद्देशून केले. नंदूरबारमधील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी शरद पवार आणि ठाकरे यांच्यावर घणाघाती टीकाही केली.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी येत्या काळात देशातील लहान प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील, काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान केले होते. तोच धागा पकडत मोदी यांनी नंदूरबारच्या जाहीर सभेतून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते 40 ते 50 वर्षांपासून राजकारणात आहेत. बारामतीमधील निवडणुकीनंतर ते इतके चिंताग्रस्त आहेत की, त्यांनी बर्याच लोकांशी सल्लामसलत करून एक विधान केले. ते इतके हताश, निराश झालेत की, त्यांना असे वाटत आहे की, 4 जूननंतर राजकारणात टिकून राहायचे असेल तर लहान लहान राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल. याचा अर्थ नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेनेने काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी मनाची तयारी केलेली आहे. 4 जूननंतर काँग्रेसमध्ये
विलीन होण्यापेक्षा छातीठोकपणे आमच्या अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडे या. तुमची स्वप्ने पूर्ण होतील, अशी थेट ऑफर मोदींनी दिली.
नंदूरबार लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी ठाकरे गटावर थेट निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, नकली शिवेसना मला गाडण्याची भाषा करत आहे. बाळासाहेब ठाकरेंना मी जवळून पाहिले आहे. बाळासाहेबांना आज किती दु:ख होत असेल.
आम्ही गरिबांना घरे दिली असून घरे म्हणजे नुसत्या भिंती दिलेल्या नाहीत. त्यासोबत गॅस कनेक्शन, पाणी, वीज हेदेखील सरकारने गरजूंना दिले आहेत. देशभरात सरकार आणखी तीन कोटी लोकांना घरे देणार आहेत ही 'मोदींची गॅरंटी' असल्याचे मोदींनी यावेळी नमूद केले. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री अनिल पाटील, उमेदवार डॉ. हीना गावित, जि. प. अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, भाजपचे महामंत्री विजय चौधरी, आमदार काशीराम पावरा, राजेश पाडवी, आमश्या पाडवी, नीलेश माळी आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ऑफरबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले की, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासोबत कधीही जाणार नाही. मोदी करीत असलेली विधाने देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक आहेत. त्यांचा विचार देशासाठी घातक आहे. अशांसोबत आम्ही जाऊच शकत नाही. देशातील लोकशाही मोदी यांच्यामुळे संकटात आली असल्याची टीका शरद पवार यांनी केली. देशातील संसदीय लोकशाही मोदी यांच्यामुळे संकटात आली असून जनमत त्यांच्या विरोधात आहे. आम्ही नेहरू, गांधी यांची विचारसरणी मानणारे आहोत. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.