पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास घडवला. नीरज हा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीबद्दल देशभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे कौतुक केले आहे. त्यांनी अभिनंदन करताना 'X' (पहिले ट्विटर) वर लिहिले, 'प्रतिभावान नीरज चोप्रा हा उत्कृष्टतेचे उदाहरण आहे. त्याचे समर्पण, अचूकता आणि उत्कटता त्याला केवळ अॅथलेटिक्समध्येच चॅम्पियन बनवत नाही तर संपूर्ण क्रीडा विश्वातील अतुलनीय उत्कृष्टतेचे प्रतीक देखील आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.'
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये ८८.१७ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय सैन्याने सुभेदार नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले. नीरज चोप्रा हा सैन्यात सुभेदार म्हणून तैनात आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन केले. "नीरज चोप्राने हे पुन्हा करून दाखवले. भारतीय अॅथलेटिक्सच्या गोल्डन बॉयने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धा जिंकली. यासह नीरज जागतिक अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. संपूर्ण देशाला तुझ्या कामगिरीचा अभिमान आहे. हा क्षण भारतीय क्रीडा इतिहासात नेहमीच लक्षात राहील," असे अनुराग ठाकूर यांनी X वर लिहिले आहे.