सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका तरुणावर, ४१ देशांमध्ये पाळण्यास बंदी असलेल्या 'पिटबुल' या पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेत कुत्र्याने आसिफ मुल्ला या तरुणाचे लचके तोडले आहेत. सोलापुरातील लक्ष्मीनारायण टॉकिजजवळ हा प्रकार घडला. सुदैवाने हा तरुण या हल्ल्यात बचावला. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, कुत्र्याचे मालक नितीन अंबुरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Pit Bull Dog)
एमआयडीसी परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण टॉकिजसमोर असलेल्या ईश्वर गारमेंटच्या आवारात गारमेंटच्या मालकाने पिटबुल प्रजातीचा कुत्रा पाळला आहे. मुल्ला हा कंपाऊंडच्या आत गेल्यानंतर पिटबुलने त्याच्यावर हल्ला चढवला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी असताना उपस्थितांपैकी कोणीही कंपाऊंडच्या आत जाऊन त्याला वाचवण्याची हिंमत दाखवू शकला नाही. मात्र, आसिफ स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत होता. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैददेखील केली. (Pit Bull Dog)