पिंपरी : भोसरी आणि प्राधिकरण येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण केंद्रातून 9 ते 10 वयोगटापासून ते 25 वयोगटापर्यंतचे मल्ल कुस्तीचे डाव-प्रतिडाव शिकत आहेत. दररोज चार तास सराव करून त्यांचे कौशल्य विकसित होत आहे. येथून घडलेल्या काही विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गाव पातळीवर सुमारे 25 ते 30 आखाडे आहेत. येथे विद्यार्थी दररोज व्यायाम करतात. मात्र, व्यावसायिक कुस्ती स्पर्धांसाठी प्रशिक्षण घेण्याची सोय महापालिकेचे भोसरी येथील कै. मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र आणि प्राधिकरण येथील संजय काळे मैदान येथेच उपलब्ध आहे. लांडगे कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सध्या 120 मुले प्रशिक्षण घेत आहेत. 9 ते 10 वयोगटापासून येथे 25 वयोगटापर्यंतच्या मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे. येथे मॅटवरच्या कुस्तीची सोय आहे.
महापालिकेच्या प्राधिकरण येथील संजय काळे मैदान येथे दीड महिन्यापूर्वी पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. सध्या येथे 22 मुले कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. 9 ते 10 वयोगटापासून थेट 22 वयोगटापर्यंतच्या मुलांचा त्यामध्ये समावेश आहे. मुलांकडून येथे सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी दोन ते अडीच तास कुस्तीचा सराव करून घेतला जात आहे. येथुनही कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन मल्ल तयार होत आहेत.
कै. मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणार्या मुलांनी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये यश खेचून आणले आहे. 15 वर्षाखालील वयोगटामध्ये झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत आर्यन मुळे (45 किलो वजनगट), प्रणव लांडगे (51 किलो वजनगट) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सागर राऊत याने युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत (20 वर्ष वयोगटाखालील) 70 किलो वजनगटात तृतीय क्रमांक तर, महाराष्ट्र केसरी (कर्जत) स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याशिवाय, शालेय राज्यस्तरीय 17 वर्षाखालील वयोगटात (52 किलो वजनगट) प्रणव लांडगे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांमध्ये विविध वजनगटांमध्ये 11 मुलांनी यश खेचून आणले. पैलवान जागृती गावडे यांनी 17 वर्षाखालील वयोगटातील (62 किलो वजनगट) शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अजय लांडगे, किशोर नखाते येथे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.
प्राधिकरणातील पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील 4 मुलांनी अहिल्यानगर येथील राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभाग घेतला होता. अमोल माने या विद्यार्थ्याने 61 किलो वजनगटात कांस्य पदक पटकावले. संभाजीनगर येथे कुमार गटात झालेल्या राज्यस्तरीय ग्रीको रोमन स्पर्धेत स्वराज काळभोर याने सहभाग घेतला होता. त्याने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक राजेश काळभोर, प्रशिक्षक ज्ञानेश्वर महांबरे हे येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.
महापालिकेच्या कै. मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणार्या मुलांनी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये चांगले यश मिळविले आहे. येथे 9 ते 10 वयोगटापासून 25 वयोगटापर्यंतच्या मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे. कुस्ती शिकणार्या विद्यार्थ्यांना पुरेसा पोषक आहार मिळावा, यासाठी महापालिकेकडे मागणी केलेली आहे.अजय लांडगे, प्रशिक्षक, कै. मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र.