शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे  File Photo
पिंपरी चिंचवड

Shiv Sena UBT | आत्मविश्वास वाढलेल्या ठाकरे सेनेचे नेतृत्व कुणाकडे?

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पक्षाचे दोन तुकडे झालेले असताना तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन-चार नगरसेवक असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पिंपरी-चिंचवड शहरातून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. शहरातील तीनपैकी दोन विधानसभेवर पक्षाने दावा केला आहे. असे असताना पक्षाच्या शहर कार्यकारिणीत बदल करून स्थानिक नेतृत्व बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभा तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक कोणत्या शिलेदाराच्या नेतृत्वाखाली लढली जाणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात निवडणूक रंगली. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे 96 हजार 615 मताधिक्याने तिसर्यांदा विजयी झाले. राज्यात नकारात्मक वातावरण असल्याने मागील निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्य तब्बल 1 लाख 19 हजार 238 ने घटले. तर, पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे पाटील यांनी तब्बल 1 लाख 88 हजार 62 मते खेचली. पिंपरीतून 76 हजार 592 आणि चिंचवडमधून 1 लाख 11 हजार 470 मते त्यांच्या पारड्यात पडली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही मते 46 हजार 404 ने अधिक आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने मागील 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे.

कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले

एकसंघ असलेल्या शिवसेनेचे महापालिकेत 9 नगरसेवक होते. त्यातील चार नगरसेवक हे शिवसेना उद्धव बाळााहेब ठाकरे पक्षासोबत कायम आहेत. शहरातील बहुतांश माजी नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी तसेच, शाखाप्रमुख आणि पदाधिकार्यांनी जीवाचे रान करीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीमुळे, पक्षफोडणे, संविधान बदलण्याच्या वक्तव्यामुळे मतदारांचा शिवसेना ठाकरे पक्षाला प्रतिसाद मिळाला. तसेच, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी व इतर घटक पक्षाचे पाठबळ मिळाले. त्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा संजोग वाघेरे पाटील यांना चांगलाच फायदा झाला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला कडवी झुंज दिली. वाघेरे यांना कर्जत विधानसभेत पक्षाला 17 हजार 660 आणि उरण विधानसभेत 13 हजार 250 मतांची आघाडी मिळाली. सहापैकी दोन विधानसभेत शिवसेना ठाकरे पक्षाने मुसंडी घेतली. तर, मावळ विधानसभेत वाघेरेंपेक्षा केवळ 4 हजार 935 मते महायुतीला अधिक मिळाली. उर्वरित तीन विधानसभेत मताधिक्य कमी करण्यात वाघेरेंना बरापैकी यश मिळाले.

पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाचा तीन जागांवर दावा

दरम्यान, चार महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघापैकी दोन मतदारसंघावर शिवसेना ठाकरे पक्षाने दावा केला आहे; मात्र, पक्षाचे स्थानिक नेतृत्व सक्षम नसल्याने आणि तिन्ही विधानसभा मतदारसंघ हाताळण्याची कुवत नसल्याने लोकसभेप्रमाणे पुन्हा मतदारांचा मोठा पाठिंबा मिळेल का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यानंतर लगोलग महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम आहे. महाविकास आघाडी एकत्रित की स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट नाही. मोठ्या संख्येने इच्छुक असलेल्या पक्षाची हाताळणी करताना स्थानिक नेतृत्व अनुभवी आणि सक्षम हवे, अशी चर्चा आहे.

उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य

पक्षफुटीनंतर आमच्या पक्षातील बहुतांश पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. लोकसभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चांगली ताकद दाखविली. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली ताकद पणाला लावली होती. उमेदवार नवखा असल्याने थोडा फटका बसला; मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या चुका सुधारून अधिक ताकदीने आम्ही लढणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील पदाधिकार्यांच्या जबाबदारीत बदल होऊ शकतात. त्या संदर्भातील निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील. तो निर्णय आम्हाला मान्य राहील, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले.

शहरप्रमुखपदासाठी अनेक जण इच्छुक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच, मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद आपल्याकडे कायम राखण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाने रणनीती आखली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे पाटील, जिल्हाप्रमुख अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, मावळ प्रचारप्रमुख योगेश बाबर, महिला जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभाप्रमुख धनजंय आल्हाट यांच्यासह बरेच जुने पदाधिकारी व माजी नगरसेवक शहरप्रमुख पदासाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने पदाधिकार्यांकडून रणनीती आखण्यात येत आहे.

कोणाच्या हाती देणार मशाल?

येत्या निवडणुकीत पक्षाला फटका बसू नये, म्हणून स्थानिक नेतृत्वासह पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांमध्ये तसेच, सर्वच आघाड्यावर बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वरिष्ठ नेत्यांकडून पिंपरी-चिंचवडसह राज्यातील इतर ठिकाणचे नेतृत्व बदल करण्यात येणार आहे. तसेच, संघटनेच्या रचनेत काही बदल करण्यात येणार आहेत, त्यादृष्टीने शहराचा आढावा घेण्यात येत आहे, असे सुत्रांनी सांगितले. तसे झाल्यास शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले यांचे पद जाऊन पिंपरी-चिंचवडच्या नव्या पक्षप्रमुखांच्या हातात मशाल दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT