जिओ टॅगिंग Pudhari
पिंपरी चिंचवड

Geo Tagging for school: जिओ टॅगिंगच्या माध्यमातून शाळांवर ’वॉच’; एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

Geo Tagging survillence: राज्यातील शाळांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार असून, जिओ टॅगिंगच्या माध्यमातून शाळांवर वॉच असणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : राज्यातील शाळांच्या कामकाजात एकसूत्रता आणण्यासाठी मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शाळांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार असून, जिओ टॅगिंगच्या माध्यमातून शाळांवर वॉच असणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांचे जिओ टॅगिंगचे काम पूर्ण झाले आहे.

राज्यातील ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असणार्‍या अंगणवाडी, विविध माध्यमांच्या शाळांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांना छायाचित्रांसह संबंधित माहिती 30 एप्रिलपर्यंत अ‍ॅपवर नोंदवणे बंधनकारक केले होते. शिवाय संबंधित शाळांनी भरलेल्या माहितीची खातरजमा करण्याची जबाबदारी शिक्षण अधिकार्‍यांना देण्यात आली आहे.

अशी मिळणार माहिती

शासनाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करुन भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी ‘महा स्कूल जीआयएस’ हे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपमध्ये शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडायस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करायचे आहे. त्यानंतर शाळेची युडयस प्लसमध्ये भरलेली माहिती या अ‍ॅपमध्ये दिसणार आहे. त्यानंतर शाळेचे जीआयएसमध्ये लोकेशनवरून शाळेचे नाव, इमारत, किचन शेड, स्वच्छतागृह आणि पाण्याची सुविधा असे एकूण 5 फोटो समाविष्ट करुन संबंधित शाळांनी माहिती भरली आहे. ही माहिती एका क्लिकवर दिसणार आहे.

असा होणार माहितीचा वापर

राज्यातील सर्व शाळांबाबतची संपूर्ण माहिती केंद्र शासनाच्या यूडीस प्लस या पोर्टलवर उपलब्ध केली आहे. विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा आदी शाळांबाबतच्या विविध माहितीचा यात समावेश आहे. शासनस्तरावर विविध धोरण, कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना या माहितीचा वापर केला जाणार आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर या संस्थेसोबत करार करुन माहिती गोळा करण्याचे काम देण्यात आले आहे.

शिक्षण विभागाच्या माहितीचे एकत्रीकरण

विविध विभागांची माहिती, यूडीस प्लस या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागांच्या माहितीचे एकत्रीकरण केले जाणार आहे. स्वतंत्र डॅशबोर्ड यासाठी तयार केले जाणार आहे. तसेच, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर या संस्थेतर्फे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारांच्या शाळाचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करण्यात येणार आहे. गोळा केलेली माहिती मोबाईल अ‍ॅप महास्कूल जीआयएसवरून उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT