पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना तयार झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळताच प्रारूप प्रभागरचना कधीही जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. महापालिकेच्या पार्किंगच्या आवारात प्रभागरचनेचे 32 नकाशे लावले जाणार आहेत. प्रभागरचनेबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेण्यात येत आहेत. महापालिकेची फेब्रुवारी 2017 नंतर आता निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रभागरचना कशी असणार, त्याबाबत तर्कविर्तक लढविले जात आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे अधिकार व कर्मचार्यांकडे प्रभागरचनेबाबत विचारणा केली जात आहे. (Latest Pimpri News)
प्रभाग नकाक्षासाठी गुगल अर्थ मॅपचा आधार
दरम्यान, महापालिका 12 मार्च 2022 पासून बरखास्त आहे. आयुक्त हे प्रशासक म्हणून 13 मार्च 2022 पासून संपूर्ण महापालिकेचे कामकाज पाहत आहेत. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या पथकाने प्रभाग रचनेचे नकाशे तयार केले आहेत. प्रभाग रचना तळवडे-चिखली या भागापासून सुरू होऊन सांगवी अशी उतरत्त्या क्रमाने करण्यात आली आहे.
शहराची सन 2011 ची जनगणना विचार घेऊन प्रत्येक प्रभागातील मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभाग नकाशे बनविण्यात आले आहेत. त्यासाठी गुगल अर्थ मॅपचा आधार घेण्यात आला आहे. आवश्यतेनुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करण्यात आली आहे. त्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व अभियंत्यांची मदतही घेण्यात आली आहे.
आयुक्त शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीनंतर प्रारूप प्रभागरचनेचा नकाशा राज्य शासनाच्या नगर विभाग विभागाकडे 5 ऑगस्टला सादर करण्यात आले आहेत. नगर विकास विभागाकडून नकाशे राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडून मान्यता शुक्रवारी (दि. 22) मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने तयार केली आहे.
महापालिका भवनातील पार्किंगच्या आवारात 32 प्रभागाचे 32 नकाशे लावण्यात येणार आहे. त्यासाठी मंडप उभारण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील सूचना देणारा फलक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. त्यामुळे प्रारूप प्रभागरचना केव्हाही प्रसिद्ध केली जाऊ शकते. त्याबाबत माजी नगरसेवक व इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या जुन्या प्रभागानुसारच नवीन प्रभाग आहे, असे सांगितले जात आहे.
प्रसिद्धीनंतर हरकती स्वीकारण्यास सहा दिवसांची मुदत
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठी वृत्तपत्रात जाहीर प्रकटनही केले जाणार आहे. त्यावर 28 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेतली जाणार आहे. तीन ते 6 ऑक्टोबर या कालवाधीत राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मंजुरी दिल्यानंतर महापालिका आयुक्त हे अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणार आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले.
प्रभागानुसार विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या फोडणार
पिंपरी-चिंचवड शहराची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 17 लाख 29 हजार 359 आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात किमान 49 हजार आणि कमाल 59 हजार मतदार संख्येचा समावेश असणार आहे. त्यानंतर 15 वर्षांत लोकसंख्येत तसेच, मतदारसंख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरात 17 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात मतदार संख्या वाढणार आहे. एक जुलै 2025 ची मतदार यादी निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार, त्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाकडून मागविण्यात आल्या आहेत. मतदार याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या प्रभागनिहाय फोडल्या जाणार आहेत.
असे असणार प्रभाग आरक्षण
महिला संख्या-64
पुरुष संख्या-64
अनुसूचित जाती-20
अनुसूचित जमाती-3
इतर मागास वर्ग (ओबीसी)-35
सर्वसाधारण महिला (खुला)-35
एकूण आरक्षित जागा-93
सर्वसाधारण (खुला) - 35
एकूण जागा-128
प्रभागरचनेस अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर वरील आरक्षण सोडत काढली जाईल.
एकूण 32 प्रभागरचनेचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्याला नगर विकास विभागाची मान्यता मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळताच प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठी सर्व तयारी करून ठेवली आहे.- अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका