Crime Death News Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Wall Collapse Accident: भिंत कोसळून इंडक्शन थर्मल कंपनीत मजूर दांपत्याचा मृत्यू

कामगार सुरक्षेबाबत प्रश्न उभे करणारी दुर्घटना; एक जखमी, पुढील तपास देहूरोड पोलिस करत आहेत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: कंपनीच्या खुल्या जागेत सीमाभिंतीचे बांधकाम सुरू असताना अचानक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मजूर दांपत्याचा मृत्यू झाला, तर एक मजूर जखमी झाला. ही घटना तळवडे येथील ज्योतिबानगर परिसरातील इंडक्शन थर्मल कंपनीच्या आवारात शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

सचिन शंकर राठोड (वय 30) आणि कोमल सचिन राठोड (25, दोघे रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी मृत्यू झालेल्या दांपत्याची नावे आहेत. तर मनोहर भिकू चव्हाण (वय 38, रा. गाडगे आळी, चाकण) हे जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील ज्योतिबानगर परिसरात इंडक्शन थर्मल कंपनीची मोकळी जागा असून त्या ठिकाणी सीमाभिंतीचे बांधकाम सुरू होते. या कामासाठी जागा मालक सदाशिव आगळे यांनी दीपक देवाजी जाधव (रा. चाकण) या ठेकेदाराला कंत्राट दिले होते. ठेकेदाराने मजूर अड्ड्यावरून कामगार आणले होते. सीमाभिंतीसाठी सिमेंटचे ब्लॉक वापरून बांधकाम सुरू होते.

शुक्रवारी सायंकाळी साडेचारपर्यंत सुमारे नऊ फूट उंचीपर्यंत भिंत उभारण्याचे काम पूर्ण झाले होते. दरम्यान, काम सुरू असतानाच अचानक भिंत कोसळली. या दुर्घटनेत राठोड दांपत्यासह तिघे जण भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. अपघात घडताच तेथील अन्य कामगारांनी तत्काळ धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता सचिन राठोड आणि कोमल राठोड यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पुढील तपास देहूरोड पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT