Pimpri Police Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Police: पोलिस ठाण्याच्या दारातच न्याय! तीन महिन्यांत 6 हजार 26 जणांचे समाधान

तक्रार दिनामुळे वाढतोय नागरिकांचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिन या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या तीन महिन्यांत 6 हजार 26 तक्रारदारांनी थेट पोलिस अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली असून, तक्रारींच्या जलद निवारणामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

तक्रारींचे तातडीने निवारण

नागरिक आणि पोलिस यांच्यातील दरी कमी करण्याबरोबरच तक्रारींचे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने निराकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आठवड्यातून एकदिवस पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आणि ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत तक्रारी ऐकून घेतल्या जातात.

अनेक प्रकरणांमध्ये जागेवरच तोडगा काढला जात असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना विविध कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज भासत नाही. एकाच ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होत असल्याने तक्रारींचे तातडीने निवारण होत आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांनाही गती मिळत असून, पोलिस यंत्रणेवरचा नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.

तक्रार निवारण दिनाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे स्वतः लक्ष ठेवत आहेत. त्यांनी काही पोलिस ठाण्यांना अचानक भेटी देत तक्रारदारांशी संवाद साधत निवारणाबाबत फीडबॅक घेतला. त्यावेळी नागरिकांनी तक्रार निवारण दिनाबाबत समाधान व्यक्त केले.

तक्रार दिनाचे महत्त्व

तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपली समस्या मांडण्याची संधी मिळत आहे. तक्रारींचे त्वरित निवारण, प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यावर भर आणि प्रलंबित प्रकरणांना गती देणे या बाबींमुळे हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. तीन महिन्यांत 6 हजार 26 तक्रारदारांनी आपले म्हणणे मांडले आहे, ही या उपक्रमाच्या यशाची पावती मानली जात आहे.

पोलिसांबद्दल सकारात्मक भावना

या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचत असून, वारंवार पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागत नाही. तक्रारींवर तात्काळ निर्णय होत असल्याने नागरिकांना त्वरित न्याय मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेबद्दल सकारात्मक भावना निर्माण होत आहे.

तक्रार निवारण दिनामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी विश्वासार्ह व्यासपीठ मिळाले आहे. तक्रारींचे जलद व पारदर्शक निवारण करण्यावर आमचा भर असून, नागरिकांचा वाढता प्रतिसाद ही या उपक्रमाच्या यशाची खरी पावती आहे.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT