मोशी- ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेले श्री नागेश्वर महाराज यांचा भंडारा उत्सव व श्री भैरवनाथ महाराज यात्रेला गुरुवार (दि.२७) पासून सुरुवात होत आहे. दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या उत्सवासाठी मोशी ग्रामस्थांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मानाच्या ओटीसाठी लाखोंच्या बोलीचा लिलाव आणि हजारोंच्या संख्येने महाप्रसादाच्या भंडाऱ्यासाठी राज्यात मोशीतील श्री नागेश्वर महाराज यांचा भंडारा उत्सव व श्री भैरवनाथ महाराज यात्रा आहे. इथे सुमारे तीस वर्षांहून अधिक काळापासून परम भक्तीचा नंदादीप अखंड तेवत आहे.
नागेश्वर महाराज भंडारा उत्सवाची जय्यत तयारी श्री नागेश्वर महाराज मंदिर व मोशी प्रवेशद्वार तपोवन भूमी येथे फुलांच्या माळा, विद्युतरोषणाईने करण्यात आली आहे. याठिकाणी काकड आरती, किर्तन, प्रवचन, नामस्मरण असे धार्मिक कार्यक्रम सुरु झाले आहेत.
महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी श्री नागेश्वर महाराजांचा भंडारा उत्सव सुरु होतो. त्यानुसार गुरुवारी(दि.२७) पासून उत्सवाला सुरुवात होत आहे. गुरुवारी बुंदी अन् शाक भाजीचा महाप्रसाद होणार आहे. शुक्रवारी श्री नागेश्वर महाराज मंदिरात (दि.२८) सकाळी दहा वाजल्यापासून मानाच्या ओटीचा आणि वस्तूंचा लिलाव होईल. शनिवार (दि.२९) कुस्त्यांचा आखाडा दुपारी तीन वाजता सुरु होणार असल्याची माहिती नागेश्वर देवस्थानचे अध्यक्ष नितीन पांडुरंग सस्ते यांनी दिली.
नागेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांकडून देणगी जमा होते. त्यामधून गोरगरीबांच्या मुलांचे विवाह, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, गोरगरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणखर्च केला जातो. ट्रस्टमार्फत वीस लाख रूपयापर्यंत शिक्षणक्षेत्रासाठी खर्च केला जात असल्याची माहिती ट्रस्टीमार्फंत देण्यात आली.
पुणे-नाशिक महामार्गावरील मोशीगावातून श्री क्षेत्र आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुख्य चौकात पूर्वाभिमुखी विशाल असे श्री नागेश्वर महाराजांचे आकर्षक असे मंदिर आहे. हे गावचे मुख्य ग्रामदैवत. गावाला एकत्र गुंफून ठेवणारा गावाला सुखी, समृद्ध ठेवणारे हे ग्रामदैवत म्हणजेच गावचे भक्ती-शक्ति स्थळ. येथील जुन्या काळातील ग्रामस्थ सांगतात की, मोशी मार्गे नाशिकला कुंभमेळ्यासाठी विविध संप्रदायांतील साधू जातात. त्यापैकीच, एका आखाड्यातील काही साधू कुंभमेळ्याहून परतत असताना त्यामधील एक साधू महाराज आजारी पडले. ते बरे झाल्यानंतरही येथेच थांबले. हेच ते श्री नागेश्वर महाराज.
गावकरी मंडळींनी गावाजवळच त्यांच्यासाठी गवत, बांबूच्या साहाय्याने एक मठ तयार केला. ते नित्य पाच घरी माधुकरी मागत. पीठ, तांदूळ आदी न शिजविलेले पदार्थ घेऊन गावाजवळीलच दक्षिणेकडील आमराईत स्वहस्ते शिजवून ते अन्न खात असत. तिथेच ध्यान-जप-तप करीत असत. गावकरी मठामध्ये त्यांच्या दर्शनाला जात असत. एका महिलेने जाणीवपूर्वक किंवा नकळत शिजविलेले अन्न वाढून त्यांचा अवमान केला. महाराजांना ते सहन झाले नाही. त्यांनी त्याचक्षणी गावातून जाण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी खूप विनवणी केली, माफी मागितली. त्यांनी सर्वांना क्षमा केली, ‘सर्वकल्याणभवतुः’ आशीर्वाद दिला; पण आपला कार्यकाळ संपुष्टात आल्याने निघायला हवे,’ असे सांगून पूर्व दिशेने ते चालू लागले. ‘सूर्य अस्ताला जाईपर्यंतच आपला प्रवास असेल,’ असे त्यांनी सांगितले. मोशीपासून पूर्व दिशेला सुमारे दहा-बारा किलोमीटर अंतरावर इंद्रायणीच्या तीरावर वसलेल्या काकडे वडगावमध्ये हे योगीमहाराज पोहचले आणि सूर्य अस्ताला गेला. त्याच ठिकाणी महाराजांनी संजीवन समाधी घेतली.
मोशीकरांनी श्री नागेश्वर महाराजांचे एक मंदिर उभारले. आमराईत कायमस्वरूपी नंदादीप प्रज्वलित केला. त्याला आज तपोभूमी म्हणतात. एवढेच नव्हे, महाराजांच्या समाधीचा दिवस माघ अमावस्येला ग्रामस्थ महाप्रसादाचा ‘भंडारा’ घालतात. आमराईच्या शेतात हजारोंच्या पंगती उठताना, सर्व सोहळा गावकऱ्यांच्या स्वयंशिस्तीत पार पडतो. महाराजांच्या पवित्र अशा मानाची ओटी आणि मानाचे लिंबू तसेच श्रद्धेने महाराजांना अर्पण केलेल्या विविध वस्तूंचा लिलाव केला जातो.
या गावाला ज्ञानोबा-तुकोबांच्या सान्निध्याचा वारसा आहे. हरिनाम सप्ताह, आषाढी, कार्तिकीला ये-जा करणाऱ्या वारकऱ्यांना ग्रामस्थ अन्नदान वाटप करत असतात, म्हणूनच येथे भक्ती आणि शक्तीचा मिलाप झालेला आहे. श्री नागेश्वराचे परमभक्त म्हणून गावातीलच नामदेव काशिबा आल्हाट यांची ख्याती होती. त्यांनी नागेश्वरांची तपोभूमी असलेल्या आमराईत नंदादीप प्रज्वलित केला. श्री नागेश्वरांच्या नंदादीपाची देखभाल, आमराईतील निगा आणि ईश्वराचे नामस्मरण यामध्ये ते अहोरात्र तल्लीन होते. १९९२ मध्ये त्यांनी देह सोडला. त्यांच्यानंतरही नंदादीप सेवा अखंडपणे चालू असून त्यांची ही सेवा त्यांचे कुटुंबीय निष्ठेने पार पाडत आहेत.