गणेश विनोदे
वडगाव मावळ: वडगाव नगरपंचायत निवडणूक झाली, पण निवडणूक निकाल तब्बल 19 दिवस लांबणीवर गेल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक सर्वांचाच हिरमोड झाला आहे. दरम्यान, निकाल लांबणीवर गेल्याने वडगावकर मात्र आकडेमोड करण्यात व्यस्त असून अनेकांच्या पैजाही लागल्या आहेत. याशिवाय काही उमेदवार कुटुंबीयांसह देवदर्शन किंवा कार्यकर्त्यांना घेऊन मनोरंजनासाठी गेले आहेत.
नगरपंचायतच्या स्थापनेनंतर 2 डिसेंबर रोजी झालेली ही दुसरी निवडणूक असून, तब्बल सात वर्षांनी निवडणूक झाल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तळेगाव नगर परिषदासाठी भाजप, राष्ट्रवादी महायुती झाली, लोणावळा नगरपरिषदसाठी किमान महायुतीच्यादृष्टीने प्रयत्न तरी झाला, परंतु वडगाव नगरपंचायत निवडणुकीत मात्र महायुतीच्यादृष्टीने काहीच प्रयत्न झाले नाही आणि ही निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत झाली.
मतदारांना भरमसाठ पैशांचे वाटप
नगराध्यक्ष पदासह नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी चांगलीच चुरशीची लढत झाली आहे. भाजप व राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून मतदारांना भरमसाठ पैशाचे वाटप झाले असून, तब्बल 50 कोटींचा चुराडा या निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत झाली असून, एखादा अपवाद सोडला तर कोणत्याच प्रभागात कोण किती मतांनी विजयी होईल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. दरम्यान, झालेले एकूण मतदान, पैशावर खरेदी केलेले मतदान, हक्काचे मतदान यावर प्रत्येकजण गणित मांडण्यात व्यस्त आहे. वडगावच्या चौकाचौकात सध्या फक्त आकडेमोडच ऐकायला मिळत आहे. अनेकांनी आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा करत पैंजाही लावल्या आहेत. यामध्ये रोख पैशाच्या पैंजा, पार्टी देण्याच्या पैंजा अशा विविध स्वरूपाच्या पैजा ऐकायला मिळत आहेत.
तर, दुसरीकडे निवडणूक लढलेले उमेदवार मात्र कुटुंबीयांसह देवदर्शन किंवा कार्यकर्त्यांसमवेत मनोरंजन करण्यासाठी पर्यटनस्थळी जाण्याच्या मार्गावर आहेत. निवडणुकीनंतर निकालापर्यंत तब्बल 19 दिवस सवड मिळाल्याने थकलेल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनाही आराम करण्यासाठी बराच कालावधी मिळाला आहे.
अंधश्रद्धेत गुरफटले उमेदवार
दरम्यान, बहुतांश उमेदवार निवडणूक काळात अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक लढण्यासाठी किंवा विजयी होण्यासाठी कुठल्याही अडचणी येऊ नये, निकाल आपल्याच बाजूने लागावायादृष्टीने काही उमेदवारांनी आपापल्या गुरूंचा आधार घेतला आहे. उमेदवारांच्या हातात गंडे अन् खड्यांच्या अंगठ्या दिसू लागल्या, होमहवन, पूजाअर्चा, अभिषेक असे बरेच प्रकार या काळात घडले आहेत. निवडणूक झाल्यानंतरही काही उमेदवार गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नामस्मरणात गुंतले आहेत.