पिंपरी : उच्चशिक्षित असूनही बेरोजगार झालेल्या उच्चशिक्षिताने बंदुकीचा धाक दाखवत घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील दोन भावांनी धाडस दाखवत त्याचा डाव उधळून लावला. ही घटना पिंपळे गुरव येथील कल्पतरू इस्टेट फेज तीनमध्ये 31 जुलै रोजी सायंकाळी घडली. आरोपीकडून बंदूक, 19 काडतुसे आणि कुकरी जप्त करण्यात आली असून, त्याला येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. (Pimpari chinchwad News)
चांगबोई सेरतो कोम (40, रा. एनआयबीएम कोंढवा, मूळ रा. मणिपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गगन सीताराम बडेजा यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगबोई हा उच्चशिक्षित असून पूर्वी तो आयटी कंपनीत एक लाख 30 हजार रुपये पगाराची नोकरी होती. मात्र, ऑगस्ट 2024 पासून तो बेरोजगार आहे. नोकरीच्या काळात त्याने कोंढवा व उंड्री-पिसोळी येथे फ्लॅट घेतले. नोकरी गेल्यानंतर हप्ते भरता न आल्याने तो कर्जबाजारी झाला होता. यातून नैराश्य आल्याने तो गुन्हेगारीकडे वळला. तपास सांगवी पोलिस करत आहेत.
पैसे मिळवण्यासाठी चांगबोईने गुगलवर ’कुठे मोठी रोकड मिळते’ याचा शोध घेतला. त्यात त्याला बँका व लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू असतात हे समजले. यानंतर कोंढवा परिसरातील बँकांमध्ये पाहणी करत असताना त्याला पंजाब नॅशनल बँकेत शाखा व्यवस्थापक असलेले सीताराम बडेजा हे दिसले. त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांनी कुठे राहतात याची माहिती मिळवली. तीन महिन्यांपासून त्याने बडेजा कुटुंबावर पाळत ठेवली होती.
आरोपी चांगबोई 31 जुलै रोजी बसने नाशिक फाट्यापर्यंत आला. तेथून थेट रिक्षाने कल्पतरू इस्टेटमध्ये पोहोचला. सहाव्या मजल्यावर पायी जाऊन बेल वाजवली. गगन यांच्या आईने दरवाजा उघडला असता बाहेर कोणी दिसले नाही. काही वेळाने पुन्हा बेल वाजल्यावर गगन यांनी दरवाजा उघडला. चांगबोई समोर उभा होता. तो म्हणाला, सीताराम बडेजा का पार्सल आया है, उनका आयडी कार्ड दिखाओ’. गगन आयडी कार्ड आणण्यासाठी आत वळले असता, चांगबोई घरात घुसला. त्याने बॅगेतून बंदूक काढून गगन यांच्या कपाळावर धरली आणि दागिने, रोकड आणण्याची धमकी दिली. यावेळी गगन यांचा भाऊही बाहेर आला. चांगबोईने त्याच्यावरही बंदूक रोखली. मात्र, दोघा भावांनी प्रसंगावधान राखून त्याला प्रतिकार केला.
झटापटीदरम्यान चांगबोईने कंबरेतील कुकरी काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु दोन्ही भावांनी त्याला खाली पाडले, त्याचे हातपाय बांधले आणि पोलिसांना बोलावले. या झटापटीत दोघेजण किरकोळ जखमी झाले.
चांगबोईवर याआधी कोणताही गुन्हा दाखल नव्हता. उच्चशिक्षित असूनही बेरोजगारीमुळे निर्माण झालेल्या तणावातून त्याने गुन्हेगारीकडे वळण्याचा निर्णय घेतला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी धाव घेत चांगबोईला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बंदूक, 19 काडतुसे, कुकरी, तसेच हातबॉम्बसदृश इलेक्ट्रिक वायर लावलेले प्लास्टिक पाईपचे तुकडे हस्तगत करण्यात आले. प्राथमिक तपासात या बंदुकीसाठी मणिपूर राज्यातील परवाना असल्याचे समोर आले आहे.
गगन आणि त्यांच्या भावाने चांगबोईचा प्रतिकार केला. आम्ही या दोघांच्या धाडसाचे कौतुक केले. आरोपीकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.”अमोल नांदेकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सांगवी