पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
तीन चाकी टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर त्याची सात वर्षीय बहीण जखमी झाली आहे. हा अपघात रविवारी (दि. २०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यासमोर घडला. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, टेम्पोचालक अल्पवयीन मुलगा आणि टेम्पोमालक श्रीनिवास थोरात (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मुलांना घेऊन दुचाकीवरून जात होत्या. दरम्यान, एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याजवळ आल्यानंतर अल्पवयीन मुलाने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात फिर्यादी यांच्या बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर सात वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. टेम्पोचालक मुलगा अल्पवयीन असल्याचे तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसल्याची माहिती असतानादेखील टेम्पोमालक श्रीनिवास थोरात यांनी टेम्पो चालविण्यास दिल्याने त्याच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.