चर्होली : आळंदी-पुणे मार्गावरील वडमुखवाडी ते चोविसावाडी परिसरातील सिग्नल व्यवस्था कायम बंद राहात आहे. येथे दिवसा वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिस नसतात. त्यात बेशिस्त वाहनचालकांनी वाहतुकीची शिस्त न पाळली की वडमुखवाडीतील तापकीर चौक आणि चोविसावाडी फाटा येथे नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. यामुळे वाहतूक प्रशासनाने येथील सिग्नल व्यवस्था सुरळीत करून वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Pimpari Chinchwad News)
शनिवारी 31 मे रोजी सायंकाळी वडमुखवाडी ते चोविसावाडी भागात वाहनांची मोठ्या रांगा लागल्या होत्या. वडमुखवाडीतील तापकीर चौक आणि चोविसावाडीतील रॉकफिट चौक या दोन्ही चौकांत सिग्नल बंद होते. तसेच या दोन्ही ठिकाणी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिस नसल्याने वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने चालवत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे दिसून आले. एकंदरीत दोन्ही ठिकाणी दोनपेक्षा जास्त पोलिस उपस्थित असतात. मात्र शनिवारी पोलिस नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
वडमुखवाडीतील तापकीर चौकात अलंकापुरमकडून येणारी वाहने, वडमुखवाडीतून येणारे वाहने, पुण्याकडून येणारे वाहने आणि आळंदीकडून येणारे वाहने यांच्यात परस्परविरोधी मार्गाने पुढे जाण्याची एकच चढाओढ दिसून आली. या गर्दीत सर्वांनी नियमांना तिलांजली दिल्याने तापकीर चौक, चोविसावाडी चौक येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
यामुळे पुणे आळंदी रस्ता मात्र जाम झाला होता. अलंकापुरमकडून येणार्या रस्त्याने पुणे नाशिक रोडकडून येणारी चाकण औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहने अगदी बिनदिक्कत तापकीर चौकातून पुणे आळंदीच्या मुख्य रस्त्यात येत होती. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच परिसरातील बेशिस्त पार्किंग, वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालविणे यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
पालखी मार्गावर तापकीर चौकाच्या जवळ मंगलकार्यालय आहेत. येथे लग्नाची तिथी अथवा कार्यक्रम असेल तर वाहने रस्त्यात व इतर पार्किंग केली जात आहेत. यामुळे कार्यक्रम संपला की एकाच वेळी अनेक वाहने बाहेर पडत असल्याने या भागात वाहतूक कोंडी होत आहे. यासंबंधी संबंधितांना नोटीस देण्यात आलेली आहे. सध्या वाहतूक विभागाकडून येथील कोंडी सोडविण्यासाठी दोन्ही चौकात वाहतूक पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत.श्रीकांत टेमगिरे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, चर्होली
पालखी मार्गावर वडमुखवाडी, चोविसावाडी भागात कायमच वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. चर्होली, आळंदी, तसेच वडमुखवाडी, चोविसावाडी भागातील बहुतांश नागरिक पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी आदी भागात नोकरी, कामधंद्यानिमित्त प्रवास करत असतात. सायंकाळी कामावरून सुटलेल्या नागरिकांना घरी जाण्याची घडबड असते. गृहिणींचे घरचे नियोजन या वाहतूक कोंडीने बघडत आहे. यामुळे वाहतूक विभागाने येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पुण्यातून आळंदीकडे येताना विश्रांतवाडी आणि वडमुखवाडी, चोविसावाडी आली की वाहतूक कोंडीची मनात भीती असते. जर येथे ट्रॅफिक जाम असेल तर कधी आपण घरी जाऊ हे सांगता येत नाही. घरातील माणसं वाट पाहत असतात. येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचा आहे. यामुळे वाहतूक विभागाने येथील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.- प्रवासी.
सिग्नल व्यवस्था बंद, वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नसलेले पोलिस यामुळे वाहनचालक नियमांना तिलांजली देत प्रवास करतात. त्यात एखादा वाहनचालक आडवीतिडवी वाहने चालवित असताना परस्पर वाद सुरू होतात. वाहने रस्त्यात उभा करून वाहनचालक वाद खेळत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहतूक विभागाने येथील कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.