नामांकित हॉटेल्सच्या हुबेहूब बनावट वेबसाईटस् file photo
पिंपरी चिंचवड

Cyber Fraud Alert : पर्यटनासाठी हॉटेल बुक करताय, सावधान..!; सायबर पोलिसांकडून सावधतेचा इशारा

बनावट वेबसाईटस् तयार करून ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून पर्यटकांची फसवणूक सुरू आहे

संतोष शिंदे

पिंपरी : गोवा, मनाली, केरळ... यावर्षी उन्हाळ्यात कुठेतरी निवांत फिरायला जायचंय, असा प्लान आखणार्‍या पर्यटकांना सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. नामांकित हॉटेल्सच्या हुबेहूब बनावट वेबसाईटस् तयार करून ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून पर्यटकांची फसवणूक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील एका कुटुंबाने लोणावळ्यातील प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये राहण्याची योजना आखली. इंटरनेटवर हॉटेल शोधताना त्यांच्या नजरेस आलेली अधिकृत वाटणारी वेबसाईट उघडून त्यांनी बुकिंग केले. त्यावर दिलेला QR कोड स्कॅन करून त्यांनी 75 हजार रुपयांचे अ‍ॅडव्हान्स पेमेंट केले. काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर ’बुकिंग कन्फर्म’ असा मेसेजही आला; मात्र प्रत्यक्षात त्या हॉटेलमध्ये त्यांच्या नावाची कोणतीही नोंद नव्हती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुटुंब हादरले.

हॉटेलचे नाव, फोटो, अगदी QR कोडही प्रोफेशनल वाटले. पेमेंटनंतर बँकिंग अ‍ॅपमध्ये सुद्धा हॉटेलचेच नाव दिसल्यामुळे आम्हांला विश्वास बसला. पण सगळे बनावट निघाले, अशी खिन्न प्रतिक्रिया पीडित तरुणाने सायबर पोलिसांकडे तक्रार देताना दिली.

हुबेहूब मात्र, नकली वेबसाईटस्

सायबर चोरट्यांनी देशातील अनेक नामवंत हॉटेल्सच्या अधिकृत वेबसाईट्सची हुबेहूब नक्कल करून बनावट वेबसाईटस् तयार केल्या आहेत. हॉटेलच्या नावात एखाद्या स्पेलिंगचा किरकोळ बदल करून, जसे की ’ Tajhotels. com’ ऐवजी ’Tajhotell. com’ अशी फसवणूक केली जाते. या बनावट वेबसाईटस्वर आकर्षक फोटो, सवलतीच्या ऑफर्स आणि तांत्रिकदृष्ट्या विश्वासार्ह वाटणारे टठ स्कॅनरही देण्यात येतात. स्कॅन केल्यानंतर जी पेमेंट लिंक उघडते, त्यामध्येही हॉटेलचेच नाव दिसते. त्यामुळे सामान्य ग्राहकाला ही फसवणूक लक्षात येत नाही.

आंतरराष्ट्रीय रॅकेटची शक्यता

राज्यभरातून अशा प्रकारच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असून अनेक नागरिक जाळ्यात सापडले आहेत. ही गुन्हेगारी साखळी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सध्या सायबर विभाग या वेबसाईटस्चा तांत्रिक माग काढत असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

खबरदरीचे उपाय

  • हॉटेलच्या अधिकृत वेबसाईटचा URL काळजीपूर्वक तपासा.

  • QR कोड किंवा थेट लिंकवरून पेमेंट टाळा; UPI ID किंवा अधिकृत अ‍ॅप वापरा.

  • बुकिंगपूर्वी फोनवरून थेट हॉटेलशी संपर्क साधा आणि माहितीची खातरजमा करा.

  • अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक किंवा सवलतींच्या ऑफरवर क्लिक करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT