तळेगाव स्टेशन-पुढारी वृत्तसेवाः तळेगाव दाभाडे परिसरात सोमाटणे, धामणे, माळवाडी, इंदोरी, वराळे आदी परिसरात दुपारी ३.३०वा.पासून विजेच्या तुफान कडकडाटासह आणि ढगांच्या गडागडाटासह वळवाचा पाऊस मध्यम स्वरुपात पडत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची धांदल उडाली. तळेगाव परिसरात बराच वेळ उन-पावसाचा खेळ चालु होता. या पावसामुळे आंब्याच्या फळांचे नुकसान होवू शकते.
बाजरी पीक ज्यांचे काढून झाले आहे त्यांचे नुकसान होणार नाही परंतू ज्यांची बाजरी काढायची राहीली आहे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच फुलझाडांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता बळीराजाकडून वर्तवली जात आहे. ऊसाचे पिकास हा पाऊस फायदेशीर आहे. या पावसामुळे कडक उष्णतेपासून, उन्हापासून आणि उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तापमान पाऊस येण्यापूर्वी सुमारे ३८ अंश सेल्सिअस होते पाऊस आल्यानंतर सायंकाळी ५वा.सुमारास ३२ अंश सेल्सिअस झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी प्रशासनाकडून डांबरीकरण आणि खड्डे बुजविणेचे राहीले आहेत त्या ठिकाणी पाणी साचलेमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत होती.