रक्तचंदनप्रकरणी आणखी तिघांना अटक File Photo
पिंपरी चिंचवड

रक्तचंदनप्रकरणी आणखी तिघांना अटक

तस्करीत आणखी तिघांचा सहभाग उघडकीस आणत त्यांना अटक केली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने 2 मार्च रोजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोठी कारवाई करत रक्तचंदनाची तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी एक कंटेनर जप्त केला असून, त्यामधून तब्बल 11 टन 490 किलो रक्तचंदन हस्तगत करण्यात आले. या कारवाईदरम्यान सुरुवातीला दोन जणांना अटक करण्यात आली होती. मात्र अधिक तपासाअंती पोलिसांनी या तस्करीत आणखी तिघांचा सहभाग उघडकीस आणत त्यांना अटक केली आहे.

सुरुवातीला राजाराम गंगाराम गायखे (42, अहिल्यानगर) आणि हरप्रीतसिंग धरमसिंग बदाना (42, वेस्ट ठाणे) यांना अटक केली होती. त्यांची चौकशी करत असताना आणखी आरोपींची नावे समोर आली. त्यानुसार, गुरुवारी (6 मार्च) पोलिसांनी श्रीकांत शंकर भिलारे (38, नवी मुंबई), इंद्रावन बाबाजी माने (34, नवी मुंबई) आणि दीपक पोपट साळवे (42, अहिल्यानगर) यांना अटक केली.

मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील पोलिस कर्मचारी महेश खांडे आणि नितीन लोखंडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे मोठी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 11 टन 490 किलो रक्तचंदन आढळले. जप्त केलेल्या रक्तचंदनाची अंदाजे किंमत 8 कोटी 61 लाख 75 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

रक्तचंदन तस्करीतील मोठे रॅकेट उघडकीस

या प्रकरणात ट्रकचालकासह आणखी एका व्यक्तीला सुरुवातीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी दरम्यान मोठ्या तस्करी रॅकेटचा छडा लागला. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, या तस्करीमध्ये आणखी तिघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी नवी मुंबई आणि अहिल्यानगर येथे शोधमोहीम राबवत श्रीकांत भिलारे, इंद्रावन माने आणि दीपक साळवे यांना अटक केली.

आणखी नावे उघड होण्याची शक्यता

याप्रकरणी आणखी कोणी या तस्करीमध्ये सहभागी आहे का, हे शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. जप्त केलेल्या रक्तचंदनाचा साठा कुठून आणला गेला आणि हा माल कोठे पाठवला जाणार होता, याचा तपास सुरू आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आणखी काही आरोपींची नावे उघड होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT