MIDC File Photo
पिंपरी चिंचवड

MIDC | नव्या गुंतवणुकीला उद्योजकांची नकारघंटा

शहरातील एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांचा दुष्काळ असल्याचे चित्र आहे.

पुढारी वृत्तसेवा

दीपेश सुराणा

पुढारी प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड

शहरातील एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांचा दुष्काळ असल्याचे चित्र आहे. परिणामी, परिसरात कार्यरत असलेले काही मोठे उद्योग त्यांच्या नवीन प्रकल्पांचा विस्तार करताना ते परजिल्ह्यात, परराज्यात उभारण्यावर भर देत आहेत.

मोठ्या उद्योगांमधील नव्या गुंतवणुकीला उद्योजकांकडून या शहरासाठी नकारघंटा मिळत आहे. शहरामध्ये १० हजारांवर छोटे-मोठे उद्योग आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा प्रमुख तीन औद्योगिक वसाहती शहरात आहेत.

त्याशिवाय, शहरातील तळवडे आयटी पार्क आणि शहरालगत हिंजवडी इन्फोटेक पार्क, चाकण औद्योगिक वसाहत यांचा विस्तार झालेला आहे. कोणत्याही उद्योगाच्या विस्तारासाठी पायाभूत सुविधा या गरजेच्या असतात. महापालिका प्रशासनाकडून शहरात सुविधा दिल्या

वाहतूक कोंडीचा विळखा

शहरातून तळवडेमार्गे चाकण येथे जाणाऱ्या वाहनांना दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे, मोशीमार्गे चाकण येथे ये-जा करणाऱ्या वाहनांनादेखील ही समस्या भेडसावते. त्याशिवाय, कुदळवाडी ते चिखली आणि एमआयडीसी परिसरातील अन्य विविध रस्त्यांवरदेखील दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीची तीव्रता जाणवते.

रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष

शहरातील एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर होत आहे. चिखली, कुदळवाडी, मोशी, तळवडे अशा विविध भागांमध्ये ही समस्या पाहण्यास मिळत आहे. रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी वारंवार केल्यानंतरही त्याबाबत पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची उद्योजकांची प्रमुख तक्रार आहे.

खंडित वीजपुरवठ्याची समस्या

उद्योग क्षेत्राला सध्या सातत्याने खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महावितरणकडून भोसरी एमआयडीसी क्षेत्रात नुकतेच दोन फीडर बसविण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात या प्रश्नावर उपाय सापडला आहे. मात्र, अद्यापही एमआयडीसी क्षेत्रातील बहुतांश भागामध्ये जाणवणार्या खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा सापडलेला नाही.

उद्योगांसाठी जमिनी मिळेना

शहरात २००७ पासून आजपर्यंत गेल्या १७ वर्षात १२६ औद्योगिक भूखंडांचे निवासी, वाणिज्य भूखंडांत रुपांतर झाले आहे. औद्योगिक क्षेत्र कमी होऊन त्या जागांवर बहुमजली गृहप्रकल्प उभे राहत आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना उद्योगांचा विस्तार करण्यासाठी उद्योजकांना औद्योगिक भूखंड मिळण्यात अडचणी येत आहेत.

शहरातील एमआयडीसी क्षेत्रात विविध पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योजकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, सध्या असलेले उद्योग परजिल्ह्यात किंवा परराज्यात स्थलांतरित होत आहेत. तर, काही मोठ्या उद्योगांना जागा मिळत नसल्याने या उद्योगांच्या विस्ताराला मर्यादा येत आहेत. राज्य सरकार, महापालिका, एमआयडीसी, महावितरण यांनी उद्योगांना सोयी- सुविधा देणे गरजेचे आहे.
संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT