पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या तीस लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पिण्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना सांडपाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक असतानाही 184 सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) बंद असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. एसटीपी सुरू करण्याचे वारंवार आवाहन करूनही एसटीपी बंद ठेवणार्या हाऊसिंग सोसायट्यांच्या एक जूनपासून पाणीपुरवठा तोडण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूने विस्तारत असून, लोकसंख्याही वेगात वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. गेल्या साडेपाच वर्षांपासून शहरवासीयांना 620 ते 630 एमएलडी पाणी दिवसाआड दिले जात आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील अनेक मोठा हाऊसिंग सोसायट्यांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहेत.
महाराष्ट्र शासनाने 2 डिसेंबर 2020 च्या नवीन एकत्रीत बांधकाम व विकास नियमावलीनुसार (युडीसीपीआर) राज्यातील 20 हजार चौरस मीटर, त्यावरील मोठ्या क्षेत्रफळाच्या बांधकामांना, 100 सदनिका असलेल्या दीड हजार चौरस मीटर बांधकाम असलेल्या किंवा दररोज 20 हजार लिटर पाण्याचा वापर करणार्या हाऊसिंग सोसायटी, शैक्षणिक संस्था, औद्योगिक, व्यापारी, सरकारी व निमसरकारी संस्था, हॉटेल, ग्रे वॉटर ट्रीटमेंटनुसार सांडपाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक केले आहे. एसटीपी न उभारणा-या सोसायट्या आणि आस्थापनांवर कारवाईचे अधिकार महापालिकेस देण्यात आला आहे.
वीस हजार चौरस मीटर बांधकाम असलेल्या हाऊसिंग सोसायटी गृहप्रकल्पात एसटीपी उभारणे बंधनकारक आहे. सोसायटीने दररोज निर्माण होणार्या सांडपाण्यावर प्रकिया करून त्या प्रकिया केलेल्या पाण्याचा उद्यानातील झाडे व रोपे, सोसायटीच्या आवारातील स्वच्छता, वाहने धुणे आदी कारणांसाठी वापरणे अपेक्षित आहे. प्रकिया केलेल्या पाण्याचा वापर झाल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी कमी होऊन, शहरातील पाणीपुरवठ्याचा वाढता ताण कमी होण्यास मदत होणार आहे. एसटीपी उभारून पाण्याचा पुनर्वापर करणाच्या सोसायट्यांना महापालिकेकडून मिळकतकर बिलात सवलतही दिली जाते. मात्र, त्यानंतरही सोसायटीधारक एसटीपी सुरू करत नाहीत. त्यामुळे महापालिकेने आता कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. एसटीपी सुरू नसलेल्या हाऊसिंग सोसायट्यांचे पाणी 1 जूनपासून तोडण्यात येणार आहे. तसे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पर्यावरण अभियांत्रिकी विभागास दिले आहेत. त्यानुसार, सोमवारपासून (दि. 2) त्या सोसायटीचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 456 मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. यातील 264 सोसायट्यांत एसटीपी सुरू आहेत. उर्वरित 184 सोसाट्यांमधील एसटीपी विविध कारणांनी बंद आहेत. महापालिकेने त्यातील 84 सोसायट्यांना पहिली, 50 सोसायट्यांना दुसरी तर, 50 सोसायट्यांना तिसरी नोटीस बजाविली आहे. त्यानंतरही या सोसायट्या खर्चाच्या कारणासह विविध कारणे देत एसटीपी बंद ठेवत आहेत. आठ सोसायट्यांनी महापालिकेच्या पथकास सोसायटीमध्ये प्रवेश दिला नाही.
अनेक मोठ्या सोसायट्यांकडून एसटीपी सुरू न करण्यामागे आर्थिक खर्च, जागेचा अभाव, बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक, अपुरा पाणीपुरवठा, देखभाल आणि विविध अडचणींचे कारण दिले जात आहे. तथापि, राज्य शासनाच्या नियमांनुसार मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना एसटीपी कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी न झाल्यास महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे