अवजड वाहन Pudhari
पिंपरी चिंचवड

अवजड वाहने ठरत आहेत 'काळ' !

अपघातांमुळे अनेकांनी प्राण गमावले

संतोष शिंदे

पिंपरी : शहरातील अवजड वाहनांच्या वाढत्या अपघातांमुळे रस्ते अपघातांची समस्या गंभीर बनली आहे. या अपघातांमुळे अनेकांना प्राण गमवावा लागत असून, दुचाकीस्वार आणि पादचार्‍यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अजवड वाहनांची बेशिस्त वाहतूक, चालकांचा बेदरकारपणा आणि प्रशासनाचा सुस्त कारभार यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

औद्योगिक क्षेत्रातील समस्या

औद्योगिक क्षेत्रामध्ये अवजड वाहनांची वाहतूक अपरिहार्य आहे. मात्र, यासाठी निश्चित वेळ आणि रस्त्यांचे नियोजन केलेले नाही. परिणामी, या वाहनांमुळे रहदारीतील अन्य वाहनचालक आणि पादचारी यांच्यासाठी अपघाताचा धोका वाढत असल्याचे जाणकार सांगतात.

बेदरकार वाहनचालक

अवजड वाहने, विशेषतः डंपर, ट्रक आणि कंटेनर हे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर सर्रासपणे धावताना दिसतात. नियमांनुसार शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर या वाहनांना बंदी असतानाही, रात्रीच्याच नव्हे, तर दिवसभरही ही वाहने शहरभर बेधडकपणे वाहतूक करतात. या वाहनांचे बेदरकार चालक वेगमर्यादा आणि नियमांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

अनेकांनी गमावले जीव

मागील काही महिन्यांतील घटनांकडे पाहता, डंपर आणि अन्य अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. वाघोली येथील भरधाव डंपरने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याची घटना अद्याप ताजी आहे. हिंजवडी, चाकण, तळवडे, महाळुंगे, निगडी आणि अन्य औद्योगिक परिसरातही अशीच परिस्थिती असून, नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

अवजड वाहनांवर कारवाई

सन 2024 मध्ये वाहतूक पोलिसांनी एकूण 37 हजार जड अवजड वाहनांवर कारवाई केली असून, 4 कोटी 23 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सन 2025 मध्ये प्रवेश बंदी असलेल्या ठिकाणांवरून प्रतिबंधित वेळेमध्ये, म्हणजे सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9, जड-अवजड वाहनांनी प्रवेश केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने ही योजना आखली असल्याचे पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन

वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहन- चालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली जाते. मागील वर्षभरात वाहनांवर दंड लावून कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात आला. मात्र, केवळ आर्थिक दंडाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. या वाहनचालकांना नियम पाळण्यासाठी आणि जबाबदारीने वाहन चालवण्यासाठी सक्षम उपाययोजना करण्याची गरज आहे.

अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही सातत्याने कारवाई करत आहोत. मागील वर्षभरात सुमारे 37 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वाहनचालक आणि वाहनमालकांनी स्वतःहून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अपघात टाळण्यासाठी कठोर कारवाईसह जनजागृतीही सुरू आहे.
बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT