उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात देशाच्या कानाकोपर्यातून आलेला कामगारवर्ग पोट भरत आहे. शहर परिसरात असणारे छोटे-मोठ्या उद्योगांमुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळत आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून उद्योगनगरीत कामगारांची हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कामगारांच्या सुरक्षिततेकडे ठेकेदार मंडळी दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्या मूलभूत गरजांना कात्री लावून स्वतःचा आर्थिक फायदा केला जात आहे. ज्यामुळे प्राणांतिक दुर्घटनांचे प्रमाण वाढत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये चाकण, भोसरी एमआयडीसी, पिंपरी, तळेगाव एमआयडीसी या परिसरात टाटा मोटर्स, महिंद्रा जनरल मोटर्स, बजाज, थरमॅक्स, फिनोलेक्स, मर्सिडीज बेंज, थिसेनक्रुप आदी नामंकित कंपन्या आहेत. तसेच, हिंजवडी आणि तळवडे येथे इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, पर्सिस्टंट, कॅपजेमिनी, स्टेरिया, सेंटल अशा माहिती तंत्रज्ञानविषयक काम करणार्या कंपन्या आहेत. यासह शहर परिसरात हजारो छोटे- मोठे उद्योग सुरू आहेत. या उद्योगांमुळे देशाच्या नकाशावर शहराची उद्योगनगरी अशी ओळख आहे.
.
प्रत्येकाच्या हाताला काम मिळत असल्याने देशाच्या कानाकोपर्यातून शहरात दररोज कामगारांचे लोंढे दाखल होत आहेत. मात्र, शहरात आलेल्या या कामगारांची जनावरांसारखी अवस्था असल्याचे दिसून येते. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. तसेच, त्यांच्या मूलभूत गरजांकडेदेखील दुर्लक्ष होत आहे. ज्यामुळे मागील काही वर्षात मोठे अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याची पोलिसदप्तरी नोंद आहे
तळवडे येथील मेणबत्ती कारखान्याला आग लागून आठ महिलांचा होरपळून
मृत्यू झाला.
पिंपळे गुरव येथे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना महादेव दगडी सभामंडप कोसळल्याने तीन मजुरांच्या मृत्यू झाला, तर आठजण जखमी झाले.
दिघीतील डुडुळगावनजीक सुरू असलेल्या बांधकाम साईटवर मालवाहू लिफ्ट कोसळल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला.
दापोडी येथे मातीचा ढिगारा अंगावर कोसळून अग्निशामकच्या जवानासह एका मजुराचा मृत्यू झाला.
हिंजवडी येथील एलअँडडब्ल्यू या बांधकाम साईटवर रात्री दहाच्या सुमारास लोखंडी बाल्कनी कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला, तर इतर 35 मजूर जखमी झाले.
बालेवाडी येथेदेखील स्लॅब कोसळून 9 मजुरांचा मृत्यू झाला होता.