IT industry  File Photo
पिंपरी चिंचवड

IT industry | आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढता तणाव; मित्र-मैत्रिणींशी बोलणे हा रामबाण उपाय

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

आयटी क्षेत्रामध्ये सध्या कामाचा ताण वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. डेडलाईन पाळण्यासाठी करावी लागणारी कसरत, वरिष्ठांकडून सातत्याने दिले जाणारे काम, सुट्टीच्या दिवशीही कामाचा लोड टाकणे यामुळे आयटी क्षेत्रातील अभियंते व कर्मचारी यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत असल्याची माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात काम करणारे अभियंते व कर्मचार्यांकडून मिळाली.

कामाच्या अतिताणामुळे सनदी लेखापाल (सीए) म्हणून एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला. अॅना सॅबेस्टियन (वय २६) तरुणीचे नाव आहे, अॅनाच्या आईने कंपनीला पाठविलेले पत्र व्हायरल झाल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.

ताण निवारणासाठी बोलते व्हावे

कामाचा ताण जास्त असल्यास त्याचा शारिरीक व मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर परिणाम होतो. तणावामुळे मधुमेहासारखा आजार होऊ शकतो. तर, नैराश्य, चिंता वाढीस लागते. कामाच्या ताणाचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. धनंजय अष्ट्ररकर यांनी व्यक्त केले.

टाइमलाइन पाळण्यासाठी धावपळ

आयटी क्षेत्रामध्ये बऱ्याचदा काम वेळेत पूर्ण व्हायला हवे, अशी अपेक्षा कंपनीला काम देणाऱ्या विविध ग्राहकांची असते. मात्र, बऱ्याचदा तांत्रिक काम हे वेळखाऊ आणि किचकट असते. हे काम वेळेत पूर्ण करण्याचा ताण आयटी कर्मचार्यावर येतो. त्याशिवाय, काही कामांसाठी वरिष्ठांकडून ८ ते १५ दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी टाइमलाईन दिलेली असते. अशा वेळी आठवड्याच्या सुट्ट्यांच्या दिवशी देखील काही वेळा काम करण्यास सांगितले जाते. या सर्वांचा परिणाम अभियंते आणि कर्मचायांवर होतो, अशी माहिती आयटी अभियंत्यांनी दिली.

तणावाची प्रमुख लक्षणे

झोप कमी होणे, चिडचिडेपणा, चिंता, मनामध्ये सतत कामाचे विचार येणे, उदास वाटणे, भीती वाटायला लागणे, धडधडणे, घाबरल्यासारखे वाटणे अशी प्रमुख लक्षणे पाहण्यास मिळतात.

कोणत्याही कामाच्या अतिरिक्त ताणामुळे मनावर आणि शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे ताण निवारणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कार्यालयात काम करताना तणाव जाणवत असेल तर त्याबाबत मित्र आणि सहकार्याशी बोलायला हवे. तसेच, वेळ आणि कामाचे योग्य नियोजन करायला हवे. गरज भासल्यास त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
डॉ. धनंजय अष्टूरकर, मानसोपचार तज्ज.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT