PMPML Pudhari
पिंपरी चिंचवड

Talegaon Bus Stop Issue: तळेगावात बसथांब्यावर निवाऱ्याचा अभाव; प्रवाशांचे हाल

उन्हात बसची वाट पाहावी लागते; प्रवाशांकडून शेड उभारणीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडे येथून पिंपरी चिंचवड व चाकणच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु तळेगाव येथील पीएमपी बस थांब्यावर पत्राशेड नसल्याने नागरिकांना भर उन्हात उभा राहून बसची वाट पाहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने येथे त्वरित बस थांबा उभारावा, अशी मागणी होत आहे.

तळेगाव दाभाडे येथून पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, खडकी, दापोडी, पुणे, कात्रज आदी ठिकाणी तसेच वडगाव, कामशेत, चाकण आदी ठिकाणी सीटी बसने प्रवास करणा-यांमध्ये कामगार, विद्यार्थी, व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आदी प्रवाशांची संख्या मोठी आहे. तळेगावच्या सभोवताली उर्से, वडगाव, नवलाख उंबरे आदी ठिकाणी औद्योगिकरण झालेले असून, अनेक कंपन्या या ठिकाणी आहेत.

तेथील अनेक कामगार तळेगाव आणि पुणे परिसरातून सीटी बसने ये-जा करणारे आहेत. तसेच दुपारी बारानंतर सुमारे तीनपर्यंत रेल्वे लोकल सेवा नाही. या कालावधीत प्रवाशांना बसशिवाय पर्याय नाही. यामुळे प्रवाशांच्या संख्येत दुपारी आणखी भर पडते. तळेगाव येथे लिंब फाटा, भंडारे हॉस्पिटल, जिजामाता चौक, नगरपरिषद, खांडगे पेट्रोल पंप, तळेगाव स्टेशन, ईगल, स्वराज नगरी, चाकण फाटा आदी ठिकाणी आणि परत असे अनेक बस थांबे असताना तळेगाव दाभाडे येथे बसथांब्यावर एखाद दुसरा अपवाद वगळता प्रवाशांच्या सेवेसाठी,निवा-यासाठी शेड नाहीत. काही ठिकाणी शेडची दुरवस्था झालेली आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. बसची वाट पाहण्यासाठी अनेक प्रवाशांना बस थांब्यावर उन्हात थांबावे लागते. पावसाळ्यातही बसस्टॉपच्या सभोवतालच्या झाडांचा आसरा घ्यावा लागतो आणि बस आली की पळत यावे लागते. हे धोकादायक आहे. तरी प्रशासनाने बस थांब्यावर सुस्थितीत शेड उभारण्याबाबत कार्यवाही करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

सीटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या पाहता बस थांब्यावर बसशेड उभारून निवाऱ्याची सोय करणे आवश्यक आहे.
आशिष खांडगे, तळेगाव
तळेगाव परिसरात अनेक ठिकाणी बसथांब्याच्या ठिकाणी प्रवाशांना निवा-यासाठी शेड नाहीत. काही शेडची दुरवस्था झालेली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
दिलीप डोळस, तळेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT