तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान शनिवारी (दि. 20) होत आहे. नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2, 7, 8 आणि 10 मधील नगरसेवकपदाच्या एकूण पाच जागांसाठी हे मतदान होणार आहे. या चारही प्रभागांतील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, निवडणूक प्रशासनाकडून मतदानप्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध
या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 20 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक दोनसाठी एमआयटी प्री-स्कूल कॅम्पस, मायमर हॉस्टेल कॅम्प येथे सहा मतदान केंद्रे असतील. प्रभाग क्रमांक सातसाठी माउंट सेंट ॲन हायस्कूलच्या मुख्य इमारतीत पाच मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक आठसाठी नवीन समर्थ विद्यालयात तीन, तर सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये दोन मतदान केंद्रे असतील. प्रभाग क्रमांक दहासाठी थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेत चार मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी आवश्यक कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
निवडणुकीची मतमोजणी रविवारी (ता. 21) सकाळी 10 वाजल्यापासून नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत होणार आहे. मतमोजणीसाठी दोन नोडल अधिकारी, 14 विभागीय अधिकारी आणि 28 मतमोजणी सहाय्यक व पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय नगर परिषदेचे 60 कर्मचारी सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत.
वाहतूक पोलिसांकडून लागू करण्यात आलेले वाहतूक बदल
जिजामाता चौक, तळेगाव स्टेशन चौकात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. यासाठी जिजामाता चौक, खांडगे पेट्रोल पंप (डावीकडे), बेटी बचाओ सर्कल, राज मेडिकल, मारुती मंदिर चौक हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. काळोखेवाडी, नगर परिषदेची नवीन इमारत परिसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. यासाठी वक्रतुंड बंगला कॉर्नर, आरोग्य आयुर्वेदिक क्लिनिक, बेटी बचाओ, राज मेडिकल चौक हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. तसेच, आदर्श विद्यालय गेट, नगर परिषदेची नवीन इमारत परिसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. यासाठी श्रीनगरी कॉर्नर, हॉटेल ईशा कॉर्नर, जिजामाता चौक हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. वतननगर बाजू, हिंदमाता भुयारी मार्ग व काका हलवाई कॉर्नर परिसरातही सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी घालण्यात आला आहे. यासाठी स्वप्ननगरी जनसेवा वाचनालय, चाकणड्ढतळेगाव महामार्ग, मराठा क्रांती चौक, तळेगाव स्टेशन चौक हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
वाहतुकीत तात्पुरते बदल
मतमोजणीच्या दिवशी नागरिकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक दिवसभरासाठी पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी अधिसूचना जारी केली असून, हे बदल रविवारी पहाटेपासून रात्री आठ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा, निवडणूक कामकाजाशी संबंधित वाहने तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता इतर वाहनांना निर्बंध असतील. या तात्पुरत्या बदलांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे व गैरसोय टाळावी, असे आवाहन तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश लोंढे यांनी केले आहे.