तळेगाव दाभाडे: गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षिततेच्यादृष्टीने तळेगाव दाभाडे शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गाची मंगळवारी (दि. १५) पोलिसांकडून पाहणी करण्यात आली.
पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या उपस्थितीत हा पाहणी दौरा पार पडला. या वेळी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जानकर, तसेच तळेगाव दाभाडे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे उपस्थित होते.
मारुती मंदिर चौक, सुभाष चौक, श्री डोळसनाथ महाराज मंदिर, चावडी चौक, गणपती चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, ६५/२३ गावतळे विसर्जन घाट आदी भागाची पाहणी करण्यात आली. तसेच, गावतळे येथील विसर्जन घाटाची पाहणी करून संभाव्य गर्दी, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक बाबींचा आढावा घेतला. विसर्जन घाटावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षात्मक बॅरेकेटिंग करण्याबाबत नगर परिषद अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
१३५ पोलिस अधिकारी सहभागी
पाहणी दौऱ्यात ६ सहायक पोलिस निरीक्षक, १२९ पोलिस अंमलदार आणि ४ होमगार्ड सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.