वडगाव मावळ: मावळ विधानसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात काम केल्याने मावळ तालुक्यातील आठ दिग्गज नेते व पदाधिकार्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी घेतला आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्षांनी केलेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
नुकत्याच झालेल्या मावळ विधानसभा निवडणूकीमध्ये महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेले तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे माहितीचे उमेदवार सुनील शेळके विरुद्ध सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे अशी लढत झाली.
कारवाईमुळे तालुक्यात खळबळ
या निवडणुकीत तालुक्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसह प्रमुख पदाधिकार्यांनी पक्षाचा आदेश डावलून अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना साथ दिली होती. दरम्यान, या निवडणुकीत आमदार शेळके हे तब्बल एक लाखाच्या मताधिक्क्यांनी विजयी झाले. त्यामुळे निवडणूक झाल्यापासून पक्षवरोधी काम करणार्या नेते व पदाधिकार्यांवर कारवाई होणार का अशी चर्चा रंगली होती. आज थेट जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कारवाई केल्याची जाहीर केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन अंकुश आंबेकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शिवाजी असवले, राष्ट्रवादीचे तळेगाव शहराध्यक्ष संतोष भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुर्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांचा समावेश आहे.
आमदार शेळके यांच्याविरुद्ध केला होता प्रचार
संबंधितांनी आमदार शेळके यांच्याविरुद्ध उघडपणाने प्रचार केला, पक्षाची शिस्त मोडली, पक्षाचा आदेश डावलला. त्यामुळे पक्षविरोधी कृती केल्यामुळे जाब विचारला असता सर्वांनी पक्षश्रेष्ठीकडे राजीनामे सादर केले. त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारुन पक्षाने सबंधित आठ जणांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, यापुढे त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही, असेही नमूद केले आहे.