पिंपरी : शहरातील इयत्ता पहिलीत शिकत असल्यापासून ते थेट १८ वर्ष वयापर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या वतीने शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. या योजनेमध्ये दरमहा २ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जात आहे.
या योजनेसाठी दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनींना ३१ ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. महापालिकेच्या www.{bmbindia.gov.in या संकेतस्थळावर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
महापालिका समाज विकास विभागाच्या दिव्यांग कल्याणकारी योजनेतंर्गत हा लाभ दिला जात आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने अर्जासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आधारकार्डची प्रत जोडणे बंधनकारक आहे.
अर्जदाराचे आई किंवा वडील यांचे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मतदान कार्ड किंवा मतदार यादीची प्रत सोबत जोडावी. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्वाबाबतचे शासकीय/महापालिका रुग्णालयाकडील वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे. तसेच, मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिकेची प्रत देखील जोडणे गरजेचे आहे.