पिंपळे निलख: पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यात मोकाट जनावरे, श्वान यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. दररोज मोकाट कुत्र्यांच्या नागरिकांना चाव घेतल्याच्या घटना घडत असताना महापालिका प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवताना दिसून येत आहे. पिंपळे निलख परिसरात मोकाट कुत्री, जनावरे यांच्या त्रासाने अक्षरश: नागरिक हैराण झाले आहेत.
पिंपळे निलख येथील गुलमोहर पार्क रस्त्यावर मोकाट जनावरांचा कळप रहदारीच्या मार्गावर ठिय्या मांडून बसत आहे. तर रस्त्यावर भटकी कुत्री टोळी करून फिरत आहेत. अशीच परिस्थिती शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाहण्यास मिळत आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचारी नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. मोकाट जनावरे भर रस्त्यात ठिय्या मांडून बसत असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. (Latest Pimpri News)
पादचारी मोकाट जनावरे, भटकी कुत्री यापासून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. कधी कुत्रा अंगावर धावून येईल आणि चावा घेईल याचा नियम नाही. दररोज भटक्या कुत्र्यांना चाव घेतल्याने शासकीय व खासगी रुग्णालयात नागरिक दाखल होत आहेत. परंतु महापालिकेचा पशूवैद्यकीय विभाग केवळ कार्यवाही सुरू आहे, असे सांगत आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवरून प्रवास करणे कठीण होत चालले आहे.
पिंपळे निलख परिसरात मोकाट जनावरे, भटक्या कु त्र्यांची संख्या मोठी आहे. यामुळे रस्त्यांवरून प्रवास करताना स्थानिक नागरिक, वाहनचालक, लहान मुले तसेच शालेय विद्यार्थी आदींचा प्रवास धोकादायक झाला आहे. लहान मुलांना रस्त्याने एकट्याला पाठविणे म्हणजे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.- महेश सदगीर, पालक.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. तर भटक्या कुत्र्यां मुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक झाला आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.- पांडुरंग इंगवले, स्थानिक