पिंपरी: पिंपरी ते निगडी या 4.519 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (महामेट्रो) वित्तीय कंपनीकडून कर्ज घेण्यात येणार आहे.
त्या कंपनीसोबत आवश्यक करारनामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकाने कर्जहमीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आवश्यक निधी उपलब्ध होऊन काम मुदतीमध्ये पूर्ण होईल, असा दावा महामेट्रोने केला आहे. (Latest Pimpri News)
चिंचवड येथील सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल ते निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण 910 कोटी 18 लाख रुपये खर्च आहे. या विस्तारीत प्रकल्पास केंद्र सरकारने 23 ऑक्टोबर 2023 ला अंतिम मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात चिंचवड स्टेशन, आकुर्डी, टिळक चौक आणि भक्ती-शक्ती समूह शिल्प असे चार मेट्रो स्टेशन आहेत.
मेट्रोच्या व्हायाडक्ट मार्गिकेचे काम 26 जून 2024 पासून सुरू करण्यात आले आहे. हे 339 कोटी रुपये खर्चाचे काम रेल विकास निगम लिमिटेड या ठेकेदार कंपनीमार्फत सुरू आहे. या कामाची मुदत 130 आठवडे आहे. या मार्गावर खोदकाम करून पिलर उभारण्यात आले आहेत.
या मेट्रो मार्गिकेसाठी वित्तीय कंपन्यांकडून अर्थसाह्य घेण्यासाठीची प्रक्रिया महामेट्रोने सुरू केली आहे. त्यादृष्टीने वित्तीय कंपन्यासोबत आवश्यक करारनामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज हमीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्याला बुधवारी (दि. 3) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
पिंपरी ते निगडी मार्गासाठी तसेच, स्वारगेट ते कात्रज या मार्गिकेसाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून (ईआयबी) कर्ज घेण्यात येणार आहे. या कर्जाला राज्य सरकारने हमी दिली आहे. त्यामुळे महामेट्रोला वित्तीय कंपनीकडून आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे. परिणामी, कामास वेग मिळणार आहे.