सहा वर्षांच्या मुलाची ‘जीबीएस’वर यशस्वी मात Pudhari
पिंपरी चिंचवड

Positive News: सहा वर्षांच्या मुलाची ‘जीबीएस’वर यशस्वी मात

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी आता त्याने जीबीएसवर यशस्वी मात केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pimpri News: पिंपरी-चिंचवडमधील सहावर्षीय मुलाला काही दिवसांपासून पेन्सिलही हातात धरता येत नव्हती. बाहेरचे खाल्ल्यामुळे जुलाबाचा त्रास झाला आणि तापही आला. दोन-तीन दिवसांनी अंथरुणातून उठून शौचास जाताना तो धडपडू लागला. त्यानंतर 14 जानेवारी रोजी धाकट्या भावासोबत खेळत असताना खाली पडला आणि त्याला पुन्हा उठताही येत नव्हते.

त्याला तातडीने औंध येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचे निदान झाले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी आता त्याने जीबीएसवर यशस्वी मात केली आहे.

आठवड्यापूर्वी जवळच्या दुकानातून सामोसे आणून खाल्ल्यानंतर मुलाला ताप आला आणि जुलाब झाले. संपूर्ण कुटुंबाला तसाच त्रास झाला. परंतु, मुलाला ताप मात्र कायम राहिला. त्याने काही दिवसांनी पाय दुखत असल्याचे सांगितले. बालवाडीत शिकणार्‍या मुलाच्या शारीरिक हालचालींमध्ये बदल झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्याला औंधमधील रुग्णालयात हलविण्यात आले.

डॉक्टरांनी एमआरआय आणि नर्व्ह कंडक्शन व्हिलॉसिटी टेस्टसह काही चाचण्या केल्या. या चाचण्यांमुळे त्याच्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मीळ न्यूरोलॉजिकल आजाराचे निदान झाले. त्याला व्हेंटिलेटवर हलविण्यात आले. फुप्फुसांमध्ये थेट ऑक्सिजन पोहचण्यास मदत करण्यासाठी त्याच्या तोंडावाटे नळी टाकण्यात आली. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करत मुलावर यशस्वी उपचार केले. त्याला गंभीर परिस्थितीतून बाहेर काढले.

एकूण रुग्णसंख्या 140

राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या नवीन 10 रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या 140 वर पोहचली आहे. यापैकी 78 रुग्ण महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. उर्वरित 26 रुग्ण पुणे महापालिका, 15 पिंपरी-चिंचवड महापालिका, 10 रुग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत. इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या 11 आहे. एकूण रुग्णांपैकी 45 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, तर 18 रुग्ण व्हेंटिलेंटरवर आहेत. आत्तापर्यंत 25 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

मुलाला जीबीएस झाल्याचा संशय होता. नर्व्ह कंडक्शन व्हिलॉसिटी टेस्ट आणि एमआरआयच्या मदतीने रुग्णामध्ये आजाराचे निदान झाले. तातडीने त्याच्यावर इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिनने (आयव्हीआयजी) उपचार सुरू केले. फिजिओथेरपी देखील सुरू केली. आमच्या टीममधील डॉ. शिजी चालीपट (चाइल्ड न्यूरोलॉजिस्ट), डॉ. उमेश वैद्य (नवजात शिशू विभागाचे प्रमुख) यांनी मुलावर यशस्वी उपचार केले.
- डॉ. विश्रुत जोशी, बालरोगतज्ज्ञ
मुलाला जीबीएसचे निदान झाल्यानंतर आमच्या पायाखालची जमीन सरकली. तज्ज्ञांनी प्रसंगावधान राखत वेळीच योग्य उपचार केल्याने त्याने हळूहळू आता शारीरिक हालचालींना सुरुवात केली आहे. आता त्याला व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यकता भासत नाही. त्याच्या स्नायूंना हळूहळू पुन्हा बळकटी मिळत आहे. 12 दिवसांनी माझ्या मुलाला हसताना आणि बोलताना पाहून जिवात जीव आला आहे.
- मुलाची आई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT