Moshi Garbage Depot Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Garbage Depot Investigation: मोशी दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन

दुर्घटनेमागील प्रत्येक पैलूची होणार सखोल चौकशी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झालेल्या भीषण दुर्घटनेच्या तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

यापूर्वी अँटनी लॉरा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता एसआयटीमार्फत दुर्घटनेमागील तांत्रिक कारणे, सुरक्षेतील त्रुटी, जबाबदारी निश्चिती आणि संबंधित सर्व घटकांची भूमिका यांचा सर्वंकष तपास केला जाणार आहे.

मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर ८ जुलै रोजी कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला होता. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. तर, अनेक जण जखमी झाले होते.

बचावकार्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सैन्य, अग्निशामक दल आणि महापालिका प्रशासनाने अनेक दिवस युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. या घटनेनंतर कचरा डेपोतील सुरक्षा व्यवस्था, देखभाल आणि संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष झाल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.

दुर्घटनेनंतर पोलिसांनी अँटनी लॉरा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपास अधिक प्रभावी आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावा, यासाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

तपासादरम्यान कचऱ्याचा ढिगारा कोसळण्यामागील तांत्रिक कारणे, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, संभाव्य धोका माहीत असूनही आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, तसेच महापालिका प्रशासन, संबंधित कंपनी आणि इतर जबाबदार घटकांची भूमिका याची कसून चौकशी केली जाणार आहे.

एसआयटीकडून आवश्यक कागदपत्रे, तज्ज्ञांचे अहवाल, घटनास्थळाशी संबंधित तांत्रिक माहिती आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. या तपासातून दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबी स्पष्ट होतील आणि दोषींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एसआयटीत ११ सदस्य

मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व पोलिस उपायुक्तांकडे देण्यात आले आहे. पथकात २ सहाय्यक पोलिस आयुक्त, १ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, १ गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, १ सहाय्यक पोलिस निरीक्षक, १ पोलिस उपनिरीक्षक आणि ४ पोलिस अंमलदारांचा समावेश आहे. हे ११ सदस्यीय पथक दुर्घटनेच्या सर्व पैलूंची तपासणी करून अहवाल सादर करणार आहे.

शासनाकडूनही स्वतंत्र चौकशी सुरू

पोलिसांच्या एसआयटीबरोबरच मोशी कचरा डेपो दुर्घटनेची राज्य शासनानेही स्वतंत्र दखल घेतली आहे. काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली असून, या समितीकडूनही दुर्घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीकडून दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
- मारुती जगताप, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT