शिरीष महाराज मोरे  (file photo)
पिंपरी चिंचवड

४ चिठ्ठ्या, अबोल वेदना अन् एक अंत...!, शिरीष महाराजांनी का उचलले टोकाचे पाऊल?

Shirish Maharaj More | घरात केलेल्या तपासात चार चिठ्ठ्या आढळून आल्या

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : रात्र झाली होती... घर शांत होतं... आई-वडील खालच्या मजल्यातील खोलीत झोपले होते. भाऊही नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत होता. पण, वरच्या मजल्यावर एका बंद दरवाजामागे, एका हसर्‍या चेहर्‍यामागे लपलेल्या खोल वेदना शेवटचा श्वास घेत होत्या. शिरीष महाराज मोरे... श्री संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज... हिंदुत्वाचा प्रचार करणारा, वारीचा अभिमान बाळगणारा, किल्ले भ्रमंती करणारा एक तेजस्वी तरुण. पण, त्याच्या मनाचा किल्ला मात्र कोसळला होता.

महाराजांनी टेबलावर बसून पेन उचललं. हात थरथरत होते. शब्द फुटत नव्हते. पण, भावनांची दाटी झाली होती. चार चिठ्ठ्या... आई-वडील, बहीण, मित्र आणि होणार्‍या पत्नीच्या नावाने. त्यात कधी शब्दांचं आवर्तन होत होतं, तर कधी अश्रूंची ओल त्या कागदांवर उमटत होती. संत तुकाराम महाराजांचे 11 वंशज शिरीष महाराजांनी (Shirish Maharaj More) बुधवारी (दि.5) राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. त्यानंतर घरात केलेल्या तपासात चार चिठ्ठ्या आढळून आल्या.

महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या

पहिली चिठ्ठी

प्रिय आकाश, मनीष, अक्षय, अजय आणि सर्वच मित्रांनो...

खरंतर युद्ध सोडून पळून जाणार्‍या माणसाने मदत मागणे चूकच आहे. पण, कृपाकरून आई-वडिलांना सांभाळा. चांगलं स्थळ पाहून दीदीचं लग्न लावून द्या. माझ्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे. तेवढा कर्जाचा डोंगर आई-वडिलांच्या डोक्यावरून उतरवा. कोणाचे किती रुपये आहेत, हे वडिलांना माहिती आहे. तरीसुद्धा मुंबई सिंगवी-17 लाख रुपये, बचत गट- 4 लाख रुपये, सोने तारण- 2 लाख 25 हजार रुपये, गाडी- 7 लाख रुपये, किरकोळ देणेदारी- 80 हजार रुपये आहेत.

यातील गाडी विकून ती नील होतील. त्यानंतर 25 लाखांचे कर्ज उरते. तुम्ही सर्वांनी थोडी थोडी मदत करून आई-वडिलांना जपा. तुम्हाला वाटत असेल, मी हे सहज फेडू शकलो असतो. पण, आता लढण्याची ताकद नाही. मला माफ करा... आणि हो, आमची नवरीबाई... तिची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून चाललोय. खूप गोड आहे प्रियांका. मला तिला कधी वेळच देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा पाहा; अन्यथा ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो.

- तुमचा शिर्‍या...

दुसरी चिठ्ठी

‘प्रिय बाळा आणि सर्व परिवार’...

‘खूप कष्ट करा. आपली इकोसिस्टिम उभी करा. मला माफ करा. थांबू नका. लढत राहा. विजय आपला नक्कीच आहे. स्वत:ला जपा. अधून-मधून वडिलांकडे लक्ष द्या. आयुष्याची इतिकर्तव्यता संपली म्हणून पूर्णविराम देत आहे.’

- शिरीष

तिसरी चिठ्ठी

‘माझी लाडाची पिनू’...

खरंतर आता कुठं तुझा हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय... तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता, म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वांत जास्त मी अपराधी कोणाचा असेल, तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही. ‘माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला, तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखी तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय.’

‘कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारतदर्शन राहिलं, सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. तू खूप गोड आहेस. नि:स्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल. जप स्वत:ला. एवढा काळ थांबलीस. आता मीच नसेल त्यामुळे थांबू नकोस. पुढे जा. खूप मोठी हो. आणि हो, खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम हो. माझ्याकडून खूप वेळा खूप सार्‍या चुका झाल्या. मला माफ कर...

- तुझाच अहो...

चौथी चिठ्ठी

प्रिय मम्मी, पप्पा, दीदी...

काय लिहू... वयाच्या 30 वर्षांपर्यंत आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या सगळ्यात तुम्ही पाठीशी उभे राहिलात. जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्षे लागतात, ते तुमच्या पाठिंब्यामुळे काही वर्षांतच मिळवलं. तुमच्यामुळेच इथवर पोहचलो. माझ्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच मान खाली घालावी लागली नाही. एवढं सुंदर जगलो. मला जन्म दिलात, एवढं घडवलंत. पाठीशी उभे राहिलात. पण, जेव्हा मी तुमच्यासाठी उभं राहायला पाहिजे, नेमका तेव्हाच तुमचा हात सोडून जातोय. कधी कधी सर्व मिळवूनसुद्धा माणूस युद्ध हरतोच. मीही थांबत आहे. याचा दोष सर्वस्वी माझाच आहे. तुम्हाला एकटं टाकून चाललोय. मला माफ करा...

- तुमचाच पप्प्या...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT