खराळवाडी: नवीन शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर शहरातील बाजारपेठामध्ये शालेय साहित्य दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शालेय साहित्य खरेदी करताना पालकांचा खिसा खाली होऊ लागला आहे. यावर्षी वह्या, पुस्तके, दप्तर, गणवेश, शूज या साहित्यांच्या किमतीत वाढ झाल्याने पालकांचे आर्थिक बजेट डबघाईस आले आहे. कागद छपाई, वाहतूक आणि मालाच्या वाढलेल्या किमतीचा थेट परिणाम शालेय साहित्याच्या दरवाढीत झाला आहे.
यावर्षी शालेय गणवेशाचे दर ३० टक्क्याने वाढले आहेत. यावर्षी चांगल्या प्रतीचे पुस्तके १०० ते ११० रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. फुलस्केप नोटबुकच्या किमतीचे भाव २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच शालेय दप्तर, रेनकोट आणि प्लास्टिक बाटल्यांच्या किमतीत ही सर्वाधिक ४० टक्के वाढ झाली आहे. वाढलेल्या खर्चामुळे शालेय साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याचे पुस्तक विक्रेते सांगतात.
या महागाईमुळे पुस्तकांच्या किमती वाढल्या आहेत. तरी मुलांना शालेय साहित्य खरेदी करावे लागत आहे. सध्या महागाई वाढली आहे त्यामुळे वह्या, पुस्तके, दप्तर, गणवेश, पेन, शूज महाग झाले आहेत. यामुळे खिशाला मोठी झळ बसत आहे. पुस्तके खरेदी करताना डिस्काउंटसाठी प्रचंड प्रमाणात विक्रेत्याची मनधरणी करावी लागत आहे.मेघा भिसे
अभ्यासक्रमात बदल झाला तरी इयत्ता २ री व ३ री इयत्तामध्ये भाषा आणि गणिताचा पाया पक्का करण्यासाठी चित्रांचा आणि खेळांचा अधिक वापर झाला आहे. इयत्ता ४ थी व ६वी मध्ये विज्ञानाची गोडी लागावी म्हणून प्रयोगावर भर आणि इतिहासात स्थानिक/राष्ट्रीय महापुरुषांच्या शौर्याचा समावेश आहे. बदललेली रंगीबेरंगी आणि आकर्षक पुस्तके जी मुलांचे लक्ष वेधून घेतील.गणेश सुवासे, शिक्षक
१० रुपयांच्या आतील पेनच्या किमती वाढल्या नाहीत; मात्र १५ रुपयांपासून पुढच्या पेनच्या किमती वाढल्या आहेत. जेम्बो साईज नोटबुकच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कापड उत्पादन खर्च तसेच पॅकिंगचे बटनाचे दर वाढल्याने यंदा गणवेश दरात २५ टक्क्याने वाढ झाली आहे. अजून खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसला तरी काही दिवसांत पालकांची गर्दी होणार आहे.धनंजय शिंदे, पुस्तक विक्रेते