Sangvi power cut Mahavitaran Pudhari
पिंपरी चिंचवड

Sangvi power cut Mahavitaran: शितोळेनगरला 16 तास बत्ती गूल; महावितरणचा भोंगळ कारभार

मेंटेनन्सच्या नावाखाली ग्राहकांकडून वसुली

पुढारी वृत्तसेवा

राजश्री अतकरे-पवार

सांगवी: स्मार्ट सिटीतील सांगवी परिसरात वीजपुरवठा सुरू असताना, शितोळेनगर भागाला मात्र महावितरणच्या नाकर्तेपणामुळे 16 तास बत्ती गूल झाल्याने नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली. गेल्या 8 दिवसांपासून सांगवी भागात विजेचा लपंडाव सुरू आहे.

भूमिगत केबल नादुरुस्त झाल्याने शितोळेनगर परिसरातील नागरिकांना भर उन्हाळ्यात अंधारात व उकाड्यात राहण्याची वेळ आली. बुधवारी सकाळी 9.30 वाजता गेलेली वीज थेट पहाटे 2 वाजेपर्यंत गायब होती. विशेष म्हणजे, महावितरण मेंटेनन्सच्या नावाखाली ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेत असताना प्रत्यक्षात मात्र कामाचा बोजवारा उडाला आहे.

नागरिकांनी महावितरणच्या कामावर संताप व्यक्त करताना एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे तो म्हणजे महावितरण प्रत्येक बिलामध्ये किंवा मीटर रीडिंगच्या वेळी मेंटेनन्सच्या नावाखाली 10 ते 20 पैसे आगाऊ रक्कम ग्राहकांकडून वसूल करते. जर प्रत्येक ग्राहकाकडून देखभाल-दुरुस्तीसाठी ही आगाऊ रक्कम घेतली जाते, तर मग गेल्या 10-15 वर्षांपासून या जुन्या केबल का बदलल्या गेल्या नाहीत? हा गोळा झालेला पैसा नक्की कोणाच्या खिशात जातोय? असा सवाल ग्राहक करत आहेत.

स्वच्छतागृहातही पाण्याचा अभाव

वीज नसल्याचा फटका पाणीपुरवठ्याला बसला. पाण्याचा दिवस असूनही वीज नसल्याने छतावरील टाक्यांमध्ये पाणी चढवता आले नाही. नागरिकांनी पाणी साठवून ठेवले होते, मात्र मोटर सुरू होत नसल्याने पिण्यापासून ते साध्या वापराच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेक घरांमध्ये टॉयलेटला जाण्यासाठीही पाणी उरले नसल्याने नागरिकांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती.

अधिकाऱ्यांची घटनास्थळाकडे पाठ

शितोळेनगरमध्ये नागरिक उकाड्याने हैराण झाले असताना महावितरणचे जबाबदार अधिकारी मात्र ”नॉट रिचेबल” होते. नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकार्‌‍यांनी आपले मोबाईल फोन बंद करून ठेवले होते. महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी केवळ काम सुरू आहे, असे साचेबद्ध उत्तर दिले. प्रत्यक्षात मात्र घटनास्थळी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा परिस्थिती हाताळण्यासाठी कोणताही तांत्रिक अधिकारी उपस्थित नव्हता.

केबल किती वेळ टिकेल, सांगता येत नाही

या भागातील मेंटेनन्सचे टेंडर सीबी इलेक्ट्रिकल्सकडे आहे. दुरुस्तीसाठी आलेल्या कंत्राटदाराच्या माणसाने दिलेल्या माहितीने नागरिकांमध्ये संताप वाढला. त्याने कबूल केले की, उन्हाळ्यामुळे वाढलेला एसीचा वापर आणि विजेचा वाढता लोड या जुन्या केबल सहन करू शकत नाहीत. दुरुस्ती केली असली तरी ही केबल आता किती वेळ टिकेल, हे आम्हालाही सांगता येत नाही.

ठळक मुद्दे:

  • सांगवी आता समस्यांचे आणि लाईट जाण्याचे हॉटस्पॉट बनले आहे.

  • केबलचे माप न घेताच काम सुरू केल्याने दुरुस्तीला विलंब.

  • जर शितोळेनगरमधील सर्व जुन्या केबल तातडीने बदलल्या नाहीत, तर नागरिक महावितरणच्या कार्यालयालासमोर आंदोलन करतील.

  • सकाळी 9.30 ला गेलेली लाईट रात्री 2 वाजता येणे, हे महावितरणच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT