Sangvi Garbage Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Gurav Sangvi Garbage Issue: सांगवीत कचऱ्याचे ढीग; स्वच्छतेचा प्रश्न गंभीर

स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहराचे गाजवणे चालू, मात्र प्रत्यक्षात सांगवी परिसरात तीन दिवस कचरा उचलला गेलेला नाही; नागरिक संतापले

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छ सर्वेक्षण 2026 मध्ये अव्वल येण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र, सांगवीत कचऱ्याचे सामाज्य निर्माण झाले आहे. स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याच्या गप्पा मारणाऱ्या आरोग्य विभागाने सांगवीला दुर्गंधीच्या खाईत लोटले असून, साठ फुटी रोडवरील कचऱ्याचे ढीग प्रशासनाच्या कार्यक्षमतेची पोलखोल करत आहेत.

सांगवीतील शकुंतलाबाई शितोळे शाळा परिसर, सांगवी-औंध पूल मुळानगर, ढोरेनगर कॉर्नर आणि दत्त आश्रम रोड यांसारख्या अतिशय वर्दळीच्या पट्‌‍ट्यात मागील तीन दिवसांपासून कचरा उचलला गेलेला नाही. रस्ते झाडून ढीग करणे एवढेच काम कर्मचारी करत असून, हे ढीग उचलणारी यंत्रणा नेमकी कुठे गायब आहे असा संतप्त सवाल विचारला जात आहे. महापालिकेचा कचरा उचलण्याचा गाजावाजा फक्त कागदी घोडे नाचवण्यापुरताच उरला आहे का?

नागरिकांच्या जीवाशी खेळ

हा रस्ता औंध-पुणे, पिंपळे गुरवला जोडणारा मुख्य दुवा आहे. हजारो नोकरदार आणि नागरिक येथून ये-जा करतात. उन्हाळ्याच्या तीवतेत या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली असून, संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने जर लवकर पावले उचलली नाही तर सांगवीत आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. स्वच्छ सर्वेक्षणाचे ‌’बँडिंग‌’ करून शहराचे नाव मोठे करण्याच्या नादात प्रत्यक्ष वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचणे हे लाजिरवाणे आहे. महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुस्त पडलेल्या आरोग्य विभागाचे कान उपटावेत आणि सांगवीकरांची या दुर्गंधीतून मुक्तता करावी अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक अटळ आहे.

नागरिकांचे प्रश्न...

  • गाड्या जातात कुठे? कचरा उचलण्यासाठी दररोज घंटागाड्या आणि डंपर येणे अपेक्षित असताना तीन दिवस कचरा का साचला?

  • प्रभाग अधिकाऱ्यांचा वचक संपला का? प्रभाग क्रमांक 32 मध्ये एवढी दुरवस्था असताना संबंधित अधिकारी एसी केबिन सोडून बाहेर कधी पडणार?

  • कंत्राटदारांचे लाड कशासाठी? कचरा संकलनाचे कंत्राट घेतलेल्या संस्थांवर दंडात्मक कारवाई का केली जात नाही?

गाडी दुरुस्तीसाठी गेल्यामुळे काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग राहिले होते. सध्या गाडी उपलब्ध झाली असून, कचरा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच संपूर्ण कचरा उचलण्यात येईल.
अंकुश झिटे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, ह क्षेत्रीय कार्यालय, मनपा
केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी शहराचे चित्र रंगविण्यापेक्षा जमिनीवरची घाण साफ करण्याकडे लक्ष द्या. साठ फुटी रोडवरचे ढीग म्हणजे महापालिकेच्या नाकर्तेपणाचे उदाहरण आहे. लवकरात लवकर कचरा उचलला नाही, तर टेम्पोत कचरा भरून पालिकेत टाकून आंदोलन करण्यात येईल.
दिलीप तनपुरे, सामाजिक कार्यकर्ते, जुनी सांगवी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT