Death Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Toxic Liquor Death: सांगवीत विषारी दारूमुळे तरुणाचा मृत्यू; मामाच्या मायेला मुकलं बाळ

उपचारादरम्यान प्रफुल्ल स्वामीचा मृत्यू; अवैध दारू व्यवसायावर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

राजश्री अतकरे

सांगवी : ज्या वयात प्रफुल्लने आपल्या आईच्या कष्टाचे पांग फेडायला हवे होते, त्याच वयात काळाने त्याच्याकडून त्याचे श्वासच हिरावून घेतले. फुगेवाडीच्या मातीतील एक उमलते फूल, प्रफुल्ल एरिक स्वामी, आज कायमचा कोमेजला आहे. विषारी दारूच्या एका घाणेरड्या खेळाने एका हसत-खेळत असलेल्या घराचा ‌‘प्रफुल्ल‌’ कायमचा हिरावून नेला आहे.

व्यवस्थेचा निष्काळजीपणा, मृत्यूशी झुंज

29 तारखेला प्रफुल्लला त्रास सुरू झाला, तेव्हा तो जीव वाचवण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे प्राथमिक उपचार, गोळ्या-औषधे आणि ओआरएस देऊन त्याला घरी पाठवण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने आणि सततच्या उलट्यांमुळे 30 तारखेला त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल करावे लागले. दाखल झाला तेव्हाच तो अत्यंत गंभीर होता. विष त्याच्या मूत्रपिंडापर्यंत पोहोचल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आणि डायलिसिसची प्रक्रिया सुरू झाली. मधल्या काळात थोडी सुधारणा वाटली, व्हेंटिलेटरवरून काढलेही गेले; परंतु नियतीचा खेळ क्रूर होता. पुन्हा प्रकृती बिघडली, प्रफुल्लला पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवले, पण अखेर आज त्याची ज्योत कायमची मावळली.

मामाच्या मायेला मुकलं बाळ

प्रफुल्लच्या बहिणीच्या (माधवी एरिक स्वामी) तीन महिन्यांच्या बाळाकडे पाहून तर उपस्थितांच्याही काळजाचा ठोका चुकत आहे. ज्या मामाच्या मायेची सावली त्याला आयुष्यभर मिळणार होती, तो मामा आता कधीच परत येणार नाही, हे त्या निरागस जिवाला कधीच कळणार नाही.

आईच्या डोळ्यांत आस्वांचा पूर!

फुगेवाडीच्या वाखारे चाळीत राहणारा प्रफुल्ल म्हणजे त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ होता. मजुरी करून आपल्या आईचा आणि बहिणीचे पालनपोषण करणारा हा तरुण घराचा कर्ता पुरुष होता. प्रफुल्लच्या जाण्याने आता त्या घरात फक्त भयाण शांतता पसरली आहे. ज्या मातेने (संभावना एरिक स्वामी) पोटाला चिमटा घेऊन प्रफुल्लला लहानाचे मोठे केले, ती आज आपल्या मुलाचे पार्थिव पाहून हंबरडा फोडत आहे. चार दिवस आयसीयूच्या बाहेर अन्नाचा एकही कण न घेता बसलेल्या आईच्या नजरेत आता फक्त मुलाच्या आठवणींचा अंधार उरला आहे.

प्रशासन जागे होणार का?

प्रफुल्ल तर गेला, पण मागे एक मोठा प्रश्न सोडून गेला आहे. फुगेवाडी आणि परिसरात सर्रास मिळणारी ही विषारी दारू किती घरांची राखरांगोळी करणार? प्रफुल्लच्या मृत्यूला जबाबदार कोण? केवळ एक तरुण नाही, तर एका कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा हात आज मातीत मिसळला आहे. ?आईच्या डोळ्यांतील अश्रू आणि त्या चिमुकल्या बाळाचे भविष्य, व्यवस्थेच्या छाताडावर बसून आज जाब विचारत आहे. प्रफुल्ल आता पुन्हा येणार नाही, पण त्याच्या जाण्याने जी जखम या कुटुंबाला झाली आहे, ती कधीही न भरून निघणारी आहे. प्रशासनाने आता तरी या अवैध धंद्यांवर वचक बसवून आणखी किती प्रफुल्ल बळी द्यायचे आहेत, याचा विचार करायला हवा...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT