पिंपरी: शहरातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये आयुष्मान कार्ड काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार अन्नधान्य वितरण कार्यालयांतर्गत (पुणे) हे कार्ड काढण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आशा सेविकांच्या माध्यमातून हे कार्ड काढले जात आहेत.
आयुष्मान भारत कार्डचे लाभार्थी हे रेशन दुकानांतून धान्य घेणारे लाभार्थी आहेत. धान्य वितरण करताना जी प्रणाली अवलंबली जाते, त्याच प्रणालीने आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामुळे कार्ड काढण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील 24 तासांमध्ये कार्ड अपडेट होऊन त्याची प्रिंट कार्डधारकाला घेता येते. त्याबाबतचा मेसेज कार्डधारकांना मोबाईलवर पाठविला जातो.
ई-सेवा केंद्रांमध्येदेखील ही सुविधा सुरू आहे. मात्र, गेल्या वर्षापासून शहरातील 317 रास्त भाव धान्य दुकानांमध्येदेखील ही कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, चालू वर्षात गेल्या रविवारपासून (दि. 9) रेशनकार्ड दुकानांमध्ये हे कार्ड काढण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी रेशन दुकानांमध्ये गर्दी होत आहे. ज्या नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे, त्या नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळते. नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये त्यांना त्याबाबतची सुविधा दिली जात आहे.
रास्त भाव धान्य दुकानांमध्ये आयुष्मान कार्ड काढण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयअंतर्गत आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या आशा सेविकांमार्फत हे कार्ड काढले जात आहेत. त्यासाठी आशा सेविकांना प्रशिक्षण दिलेले आहे.- गजानन देशमुख, शिधापत्रिका कार्यालय, परिमंडळ अधिकारी, भोसरी.
शहरातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये 2019 पर्यंतची ऑनलाईन नोंदणी असलेल्या रेशनकार्ड धारकांचे आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया गेल्या वर्षापासून सुरू झाली आहे. 2023-24 पर्यंतच्या नोंदणी झालेल्या रेशनकार्ड धारकांचेही आयुष्मान कार्ड काढता यावे, यासाठी ऑनलाईन माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही शासनामार्फत सुरू आहे.विजय गुप्ता, खजिनदार, महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशन.
रास्त भाव धान्य दुकानांमध्ये आयुष्मान योजनेचे कार्ड काढण्याचे काम यंदा गेल्या रविवारपासून (दि. 9) सुरू झाले. कार्ड काढण्यासाठी आशा सेविका येत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 24 तासांमध्ये ते अपडेट होते. त्याचा मेसेज कार्डधारकांना मोबाईलवर पाठविला जातो.- विक्रम छाजेड, रास्त भाव धान्य दुकानदार.