लोणावळा: लोणावळ्यात मंगळवार (दि. 27) मध्यरात्रीच्या सुमारास 20 ते 22 दरोडेखोरांनी घरात घुसून दहशत निर्माण केली; तसेच त्यांनी तलवार, कुकरी आणि दांडक्यांच्या सहाय्याने बंगल्यातील दरवाजे फोडले व घरातील सर्वांना बांधून ठेवले व 11 लाख 50 हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास केली. (Pimpari Chinchwad News)
ही घटना 27 मे रोजी रात्री तीनच्या दरम्यान घडली. फिर्यादी तरुण चंद्रमोहन खंडेलवाल (58) हे लोणावळ्यातील खंडगेवाडी येथील रहिवासी असून, त्यांचे चुलते डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल यांच्या ओम श्री बंगला येथे ही दरोड्याची घटना घडली.
दरोडेखोरांनी बंगल्याचे लोखंडी गेट, मुख्य दरवाजा आणि बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांनी बंगल्याच्या पोर्चमध्ये झोपलेल्या वॉचमन अंबादास रायबोने आणि त्याची पत्नी वर्षा यांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले आणि तोंडात कापड कोंबले. त्यानंतर त्यांनी डॉ. खंडेलवाल व त्यांच्या पत्नीला बेडरूममध्ये बांधून ठेवले.
प्राणघातक हत्यारे दाखवत, आवाज केला तर ठार मारू, अशी धमकी देत दरोडेखोरांनी 11 लाख 25 हजारांचे दागिने व 25 हजारांची रोख रक्कम असा एकूण 11 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला.
घटनेनंतर लोणावळा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध सुरू आहे.