पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प ते किवळे येथील मुकाई चौक या बीआरटीएस मार्गावर ४५ मीटर उर्वरीत रस्ता विकसित करण्यात येत आहे. मात्र, रावेत परिसरात काही ठिकाणी जागामालकांनी जागा अडवून धरली आहे.
ते अतिक्रमण महापालिकेच्या वतीने कारवाई करीत बुधवारी (दि. २५) हटविण्यात आले. या मार्गावरील अनेक वर्षांपासून रखडून अपूर्ण स्थितीतील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे; मात्र बीआरटीएस मार्ग अपूर्ण अवस्थेत असल्याने तसेच, काही ठिकाणी जागा ताब्यात नसल्याने कच्चा रस्ता आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांची गैरसोय होत आहे. या संदर्भात 'पुढारी' ने वारंवार छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करून महापालिका प्रशासनाच्या कासव गती कारभार समोर आणला होता. त्याची दखल घेऊन अखेर, महापालिकेने या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार (डीपी) या रस्त्याचे भूसंपादन विशेष अधिकार्यांनी १४ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या निवड्यानुसार केले आहे. या रस्त्यावर मूळ जागामालकांनी अडथळा करून अडवलेल्या के व्हिला चौक, भाजी मंडई आदी ठिकाणी महापालिकेच्या वतीने आज पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. तेथील अतिक्रमण हटविण्यात आले.
स्थापत्य प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद औंभासे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड व विजय भोजने, उपअभियंता संजय काशिद, सुनिल पवार, कनिष्ठ अभियंता यांच्या पथकाने ही कारवाई केली. उर्वरीत कारवाई पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर हा रस्ता ४५ मीटर रुंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी किवळे येथील माळवले नगर या ठिकाणची वाहतूक सुरळीत होणार मदत होईल, असे मुख्य अभियंता प्रमोद औंभासे यांनी सांगितले.