पिंपरी: शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि जलस्रोतांवरील ताणामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याने भूजल पातळीवर गंभीर परिणाम होत आहेत.
ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने आता मोठा आणि पर्यावरणपूरक निर्णय घेण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. बांधकामासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचे पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर बंधनकारक करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होऊन पाणी टंचाईत शहराला दिलासा मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात गेल्या सात वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा राज्यभर दुष्काळ आहे. त्यासाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रक्रिया केलेले सांडपाणी हे काही उद्यानांना वापरले जात आहे. आता बांधकाम प्रकल्पांना पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातून एकूण ५० एमएलडी प्रक्रिया केलेले सांडपाणी उपलब्ध होते. मात्र, बांधकाम क्षेत्रात त्याचा वापर बंधनकारक नसल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याच्या व बोअरींगच्या पाण्याचा वापर केला जातो.
नागपूर, सुरत, बंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी उद्योग व बांधकाम क्षेत्रासाठी पुरविले जाते. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही प्रक्रिया केलेले पाणी बांधकामांना वापरण्याचे धोरण राबवण्यात येत आहे.
पाणी टंचाई आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत विकास साध्य करण्यासाठी, पाण्याची बचत करण्यासाठी व जलसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी सर्व बांधकाम प्रकल्पांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर अनिवार्य करण्यात येणार आहे. प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर न केल्यास संबंधित व्यक्ती व संस्थेविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
बांधकामासाठी शंभर टक्के प्रक्रिया केलेले पाणी वापर बंधनकारक
बांधकामाकरिता १०० टक्के प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करणे, ही अट बांधकाम परवानगी नियमावलीमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. त्यासंदर्भात नियमावली तयार करण्यात येत आहे. पाण्यासाठी विकासकाने किंवा बाधकाम व्यावसायिकाने शुल्क जमा केल्यानंतर ते पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, जास्त पाणी लागल्यास, महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातून प्रचलित दरानुसार पाणी उपलब्ध केले जाणार आहे.
पाण्याचा पुनर्वापर झाल्याने पिण्याच्या पाण्याची होणार बचत
सध्या बांधकाम प्रकल्प बोरवेलचे पाणी वापरतात. त्यामुळे याचा परिणाम जमिनीतील पाणी पातळीवर होत आहे. नवीन धोरणामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच, चोरी थांबणार आहे. त्याचबरोबर सांडपाण्याचा पुनर्वापर झाल्याने पर्यावरणाचे रक्षण होईल व महापालिकेला महसूलही मिळेल, यासाठी धोरण राबविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सर्व मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्रात टँकरने पाणी भरण्याकरिता व्यवस्था केली आहे. सद्यस्थितीत टँकर किंवा पाइपलाइनने पाणी हवे असल्यास टँकर किंवा पाइपलाइनची व्यवस्था संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी स्वखर्चाने करणे आवश्यक असणार आहे.
वाढत्या नगरीकरणामुळे भविष्यात पाणी प्रश्न तीव्र होऊ नये, यासाठी महापालिकेच्यावतीने कठोर पावले उचलली जात आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प होत असल्याने भूजल पातळीवर परिणाम होत आहे. त्यामुळे बांधकामांसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचाच वापर बंधनकारक करण्यात येणार आहे; अन्यथा कारवाई केली जाईल. यासंदर्भात विकासक व बांधकाम व्यावसायिकांना काही अडचणी असल्यास त्यांना मदत केली जाणार आहे.- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका