पिंपरी: रक्षाबंधन हा भाऊ- बहिणीच्या प्रेम, विश्वास, आणि जिव्हाळयाचा पवित्र सण अधिक आनंददायी करण्यासाठी तसेच परदेशात राहणाऱ्या भावंडांपर्यंतही बहिणीची राखी वेळेत आणि सुरक्षित पोहोचावी यासाठी भारतीय टपाल विभागाने राखी पाठविण्यासाठी वॉटरप्रूफ पाकिट उपलब्ध केले आहे. या सुविधेमुळे राखी खराब न होत्या आपल्या लाडक्या भाऊरायापर्यंत पोहोचू शकेल.
पिंपरी- चिंचवड शहरातील प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये अवघ्या १२ रुपयांत विशेष प्लास्टिक कव्हर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. स्पीड पोस्टच्या माध्यमातून देश- विदेशात राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
पिंपरी, आकुर्डी, निगडी, चिंचवड भोसरी, चिखली, सांगवी आदी टपाल कार्यालयांमध्ये हे विशेष कव्हर विक्रीस ठेवण्यात आले आहे. मजबूत आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे पोस्टाच्या प्रवासात राखी सुरक्षित राहण्यास मदत होते. त्यामुळे दूरदेशी असेलेल्या भावंडांपर्यंतही बहिणीच्या प्रेमाचा धागा सुरक्षितपणे पोहोचू शकतो. त्यामुळे पोस्टाने ही सेवा सुरु केली आहे.
पार्सलच्या वजनानुसार शुल्क:
स्पीड पोस्टच्या सुविधेनुसार राखी पाठविण्यासाठी शुल्क हे पार्सलच्या वजनानुसार आकारले जाते. रक्षाबंधनाच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन अनेक टपाल कार्यलयांमध्ये स्वतंत्र बुकिंग काउंटर सुरु करण्यात आले आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पिंपरी- चिंचवडमधील अनेकजण विदेशात वास्तव्यास आहेत. राखी वेळेत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी आगाऊ राखी पोस्ट करावी. जेणेकरून रक्षाबंधनावेळी राखी आपल्या स्वकीयांपर्यंत पोहोचू शकेल.
भावा-बहिणीच्या अनमोल नात्याच्या सणासाठी अर्थात रक्षाबंधनानिमित्त टपाल विभागाने राखी पाठविण्यासाठी प्लास्टिक कव्हर उपलब्ध करुन दिले आहे. स्पीड पोस्टद्वारे सुरक्षितपणे राखी देश- विदेशात पाठविण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहे.समीर महाजन, प्रशासकीय अधिकारी वरिष्ठ डाक, अधिक्षक.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने परदेशात असणाऱ्या बहीण आणि भावाच्या नात्यातील प्रेम आणखी दृढ व्हावे यासाठी टपाल विभागाच्या वतीने ही सेवा सुरु केली आहे.नितीन बने, जनसंपर्क पोस्ट विभाग.