पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन जीवन संपवले; मात्र सुनेच्या अंगावर मारहाणीचे व्रण असल्यामुळे सासारच्यांनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी (दि. 16) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
वैष्णवी शशांक हगवणे (वय 24) असे जीवन संपवलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी वैष्णवी यांचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 26 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे; मात्र राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे दोघे अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणाची माहिती अशी, वैष्णवी आणि शशांक यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही दिवसांतच हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीचा छळ सुरू केला. वेगवेगळ्या कारणांसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावल्याचे अनिल कस्पटे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
वैष्णवीच्या वडिलांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्याविरोधात हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. हुंड्यासाठी वैष्णवीचे आयुष्य संपवले, असा दावाही करण्यात आला आहे.
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी मुलीच्या लग्नात 51 तोळे सोने आणि फॉर्च्युनर कार भेट दिली होती. या शाही लग्न सोहळ्याला अजित पवार यांनीदेखील भेट देत शुभेच्छा दिल्या होत्या. लग्न मंडपात लावलेली कार पाहून अजित पवार यांनी अनिल कस्पटे यांना ‘तुम्ही स्वतःहून कार दिली की हगवणे कुटुंबीयांनी कार मागितली?’ असा खोचक सवाल सर्वांसमक्ष केला होता.