वैष्णवी प्रकरणात सरकारतर्फे आर. आर. कावेडिया Pudhari
पिंपरी चिंचवड

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी प्रकरणात सरकारतर्फे कोण मांडणार बाजू? कस्पटे कुटुंबीयांची मागणी अखेर मान्य

ही नियुक्ती राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली असून, कस्पटे कुटुंबीयांनी याबाबत सरकारचे आभार व्यक्त केले

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन लढाई आता निर्णायक वळणावर येत आहे. या संवेदनशील प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारकडून आर. आर. कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली असून, कस्पटे कुटुंबीयांनी याबाबत सरकारचे आभार व्यक्त केले आहे.

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर उभ्या महाराष्ट्राचे मन सुन्न झाले. सासरच्या मंडळींनी दिलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने १६ मे रोजी भुकूम येथे गळफास लावून जीवन संपवले. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी केवळ पोलीस तपासातच नव्हे तर न्यायालयीन प्रक्रियेतही न्याय मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याअंतर्गत “आम्हाला अनुभवी सरकारी वकील हवा जो या गुन्ह्याच्या संवेदनशीलतेला समजून घेईल आणि आरोपींना कायदेशीर शिक्षा होईल यासाठी सक्षम युक्तिवाद करेल,” अशी कस्पटे कुटुंबीयांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती.

“सरकारने आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून कावेडिया यांची नियुक्ती केली, याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो. आता आम्हाला आशा आहे की या प्रकरणात आम्हाला न्याय मिळेल आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल.”
अनिल कस्पटे, वैष्णवीचे वडील, वाकड

या मागणीची दखल घेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली. कावेडिया हे अनेक गुन्हेगारी आणि गंभीर खटल्यांचे यशस्वी प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील असून त्यांचा गुन्हेगारी कायद्यात विशेष अनुभव आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारी बाजू अधिक सक्षमपणे मांडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT