प्रातिनिधीक छायाचित्र File Photo
पिंपरी चिंचवड

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कोट्यवधींचे चंदन जप्त!

Pune Crime News | आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मालमत्ता विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त केले असून, एका मोठ्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी एका कंटेनरमध्ये लपवून नेले जात असलेले १० ते १५ टन वजनी चंदन पकडले आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मालमत्ता विरोधी पथकाला मिळाली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे मालमत्ता विरोधी पथकाने तात्काळ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सापळा रचला. संशयास्पद कंटेनर दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले आणि चौकशी सुरू केली. सुरुवातीला वाहनचालक आणि तस्करांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कंटेनर उघडून पाहताच मोठ्या प्रमाणावर चंदन लपवून ठेवलेले आढळले.

कोट्यवधी रुपयांच्या चंदनाची तस्करी

पोलिसांनी त्वरित कारवाई करत संपूर्ण कंटेनर ताब्यात घेतला आणि त्यातील चंदनाचा साठा जप्त केला. प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या चंदनाची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असू शकते. या चंदनाची तस्करी आंतरराष्ट्रीय बाजारात करण्याचा डाव होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस

या प्रकरणात पोलिसांनी वाहनचालकासह संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून हे चंदन बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईला पाठवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही तस्करी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी करण्यात येत असल्याचा संशय आहे. या तस्करीमध्ये मोठे माफिया गट सामील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT